खळबळजनक ! सोलापुरमधील मोदी स्मशानभूमीतून १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब

0

सोलापुर(Solapur) १६ जून :- सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या १० महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याच प्रकार समोर आला आहे. सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने स्मशानभूमीत पोहोचून सबंधित बातमीचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांश वाघमारे (वय वर्षे १० महिने) असं मृत बाळाचे नाव आहे. प्रियांशला खेळताना दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान १४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता.

प्रियांशच्या कुटुंबियांनी त्याच्यावर शहरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले होते. आज रविवारी तिसऱ्या दिवसाचा विधी पार पाडण्यासाठी वाघमारे कुटुंबिय मोदी स्मशानभूमीत पोहचले. यावेळी त्यांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी एक खड्डा आढळून आला. प्रियांशचा मृतदेह उकरून नेला असावा, असा संशय वाघमारे कुटुंबियांना आला

त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. स्मशानभूमीतून मृतदेह गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियांशचा मृतदेह जादू टोण्याच्या प्रकारासाठी उकरून नेला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.