आशिष गोस्वामी यांना उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार प्रदान

0

:जंगलाचे देणे फेडण्यासाठी प्रत्येकाने समोर यावे – नरेश झुरमुरे यांचे आवाहन

नागपूर (Nagpur) , 19 मार्च

केवळ वन अधिकारी आणि वनासाठी काम करणारे कर्मचारी जंगल वाचवू शकत नाही, हे सत्य आहे, तेव्हा वनाच्या संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे यावे. आपला एक एक श्वास हा जंगलाची, निसर्गाची देण आहे, असे प्रतिपादन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे यांनी येथे केले.

वनराई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून आज, शुक्रवार, 21 मार्च रोजी आयोजित ‘उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार’ वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सन 2025 चा हा पुरस्कार वर्धा येथील ‘‘करुणाश्रम’’ या संस्थेचे संचालक आशिष नारायण गोस्वामी यांना प्रदान करण्यात आला आहे. श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी न्यायाधीश विकास सिरपूरकर यांनी भूषविले.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आशिष गोस्वामी यांना त्यांच्या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि 21 हजार रु. रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. वनसंरक्षणाबाबत भरीव कार्य करणार्‍या व्यक्ती किंवा संस्थेला दरवर्षी हा पुरस्कार जागतिक वनदिनानिमित्त दिला जातो.

अनेक वन्यप्राणी, वनस्पती नष्ट होत असून, त्याची उपयुक्तता जाणून त्याचे जतन करावे, काँक्रिटच्या जंगलापेक्षा निसर्गाच्या अधिवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी बोलताना नरेश झुरमुरे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना आशिष गोस्वामी यांनी, माझ्या वरिष्ठांच्या माध्यमातून माझा स्व. उत्तमराव पाटील यांच्या उत्तुंग कार्याशी परिचय झाला. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. कौस्तुभ गावंडे, ऋषीकेश गोडसे आणि माझ्या संस्थेच्या परिवाराशिवाय माझे कार्य अधुरे आहे. शस्त्राशिवाय लढणार्‍या वनपालांबाबत विचार व्हावा आणि जंगलातील गुन्ह्याबाबत तात्काळ निर्णय न होता, सत्याची पडताळणी करुन वनअधिकारी व वनमजुरांनाही न्याय द्यावा. त्यांचे कार्य खरेच कठीण आणि स्तुत्य असते, असे उद्गार काढले.

एकेकाळी ग्रामीण भागातील लोकांसाठी निस्तारच्या माध्यमातून गावकर्‍यांना लाकूड पुरवठा करण्यात येत होता. तो पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे कारण गावागावात अजुनही गॅस सिलेंडर पोहोचले नाही. जंगलात लागणार्‍या आगींवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून वन्यप्राणी व मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी बफर झोनला आणखी वाढवणे गरजेचे झाले आहे. प्राण्यांच्या स्थलांतरणासाठी कॉरिडॉर करणे आवश्यक आहे. वन कर्मचार्‍यांना इलेक्शन ड्युटीमधून सूट दिली पाहिजे, आदी मागण्या अजय पाटील यांनी प्रास्ताविकातून केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जतकर यांनी केले तर आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.
मंचावर अजय मल्ल, माधव मनमोड , शुभम काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रगती पाटील, शुभांकर पाटील, विजय भोयर, बांबूमहर्षी सुनिल जोशी, विजय भोयर, उषा ठाकरे, नरेश गडेकर, दीपक फाटे, डॉ. पिनाक दंदे, हरविंदर सिंह मुल्ला,आनंद तिडके, सिद्धार्थ मेश्राम, अलका तायडे, भरत मडावी, अनिता मगरे, सौरभ मगरे, भारत मडावी, कार्तिक अस्वले , विवेक सिंह, अंजली पाटील, डॉ सुशांत पाटील , दीपक मगरे , प्रीती पाटील आदींची उपस्थिती होती.

प्रामाणिकपणे वनसंवर्धन करा : निवृत्त न्या. सिरपूरकर
अमंत्रं अक्षरं नास्ति, नास्ति मुलं अनौषधं, अर्थात कुठलीही वनस्पती निरुपयोगी नाही. निसर्ग ओरबाडणे ही वाईट तृष्णा आहे. कौतुक किंवा मिरवण्यासाठी नव्हे तर प्रामाणिकपणे वनसंवर्धनाचा प्रयत्न करा. जंगलाकडे बघण्याची दृष्टी बदलून, छोट्या सहृदयी कृतीतूनही निसर्ग वाचवा, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात विकास सिरपूरकर यांनी केले.