

नागपूर (Nagpur):- आषाढ महिन्याच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आषाढघन शब्द सुरांची बरसात करणाऱ्या ‘सांज पावसाची’ या कार्यक्रमाचे शुक्रवार, 18 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे.विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात होणा-या या कार्यक्रमात कविवर्य बा. भ. बोरकर, शंकर वैद्य, शांता शेळके, सुरेश भट, ग्रेस, ना. धो. महानोर, सौमित्र, अरुण म्हात्रे, नलेश पाटील, विठ्ठल वाघ, शिवा राऊत, तीर्थराज कापगते, सुनील शिनखेडे यासारख्या नामवंत कवींच्या पावसाच्या कवितांचे अभिवाचन सुप्रसिद्ध नाट्य कलावंत विनय मोडक, ग्रंथ सहवासचे ग्रंथालय संचालक विवेक अलोणी आणि सुप्रसिद्ध निवेदिका वृषाली देशपांडे करतील.
या कार्यक्रमाची संकल्पना ग्रंथालय संचालक प्रा विवेक अलोणी यांची आहे.याच कार्यक्रमात अतिशय गाजलेली, लोकप्रिय पावसाची भावगीते आणि पाऊस गाणी सुप्रसिद्ध गायिका डॉ. मंजिरी वैद्य अय्यर, भाग्यश्री टिकले आणि राजेश खींची सादर करणार आहेत. त्यांना गोविंद गडीकर, अरविंद उपाध्ये, मोरेश्वर दहासहस्त्र आणि विक्रम जोशी वाद्यसंगत करणार आहेत.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहायक केंद्र निदेशक दीपक कुळकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला साहित्य आणि संगीत प्रेमी रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.