रिक्षा वाढल्या तरी शहरात थांबे तेवढेच

0

सोलापूर (Solapur), 11 सप्टेंबर वाहतुकीला अडथळा व कोणताही अपघात होणार नाही, अशा चौकांमध्ये रस्त्यांलगत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे थांबे असतात. सात-आठ वर्षांपूर्वी शहरातील रिक्षांसाठी २२७ थांबे निश्चित करण्यात आले. मात्र, त्यानंतर रिक्षांची संख्या भरमसाट वाढली, पण थांबे तेवढेच राहिले.

रिक्षाचालकांमध्येच सध्या स्पर्धा सुरू असून अनेकजण थांब्यांवर थांबतच नाहीत. वाटेत प्रवासी दिसेल तेथे थांबून त्यांची वाहतूक करतात. त्यामुळे किरकोळ अपघात वाढले असून वाहतूक कोंडीसाठी देखील हा बेशिस्तपणा कारणीभूत ठरू लागला आहे.

सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांचे परमीट खुले आहे. त्यामुळे सोलापूर शहरात दरवर्षी साधारणत: ६०० ते ११५० रिक्षात वाढ होत आहे.

दुसरीकडे महापालिकेची परिवहन व्यवस्था मोडकळीस आल्याची स्थिती आहे. सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सध्या १३ हजार ऑटोरिक्षा आहेत, ज्यातून प्रवासी वाहतूक केली जाते.

महापालिकेची परिवहन व्यवस्था मोडकळीस आली असून एसटी बसगाड्या शहरातील सर्वच नगरांमधील रस्त्यांवरून धावू शकत नाहीत. त्यामुळे शहरात दरमहा ६५ ते ८० ऑटोरिक्षा वाढत आहेत.