एथर कंपनी करणार महाराष्ट्रात गुंतवणूक

0

छत्रपती संभाजीनगरात उभारणार प्रकल्प

सुमारे 4 हजार रोजगार निर्मीती होणार

मुंबई(Mumbai), 26 जून :- ईलेक्ट्रॉनिक व्हेईकल (ईव्ही) क्षेत्रातील एथर ही कंपनी महाराष्ट्रात 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात या कंपनीचा उत्पादन प्रकल्प राहणार आहे. तसेच यामाध्यमातून 4 हजार रोजगारांची निर्मीती होईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, एथर एनर्जी कंपनी लवकरच ऑरिक सिटीच्या बिडकीन एमआयडीसीमध्ये 100 एकर जागेत आपला प्रकल्प उभारणार आहे. महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प डीएमआयसीमध्ये उभारण्यासाठी 2 वर्षांपूर्वी चाचपणी करण्यास सुरुवात केली होती. अधिकाऱ्यांनी जागेचीही पाहणी केली होती. एवढेच नव्हे तर येथील सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली होती. सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन एमएआयडीसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. एथरचा हा तिसरा उत्पादन प्रकल्प आहे. या कंपनीला हिरो मोटो कॉर्पचे आर्थि पाठबळ आहे.

एथरचा अत्याधुनिक प्लांट दरवर्षी एक दशलक्ष युनिटपर्यंत वाहने आणि बॅटरी पॅक दोन्ही तयार करणार आहे. समृद्धी द्रुतगती मार्गाद्वारे प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे, गुंतवणूकदार या मराठवाड्याची क्षमता वाढवत आहेत. एथरने मराठवाड्याची केलेली निवड महाराष्ट्राच्या विकासकथेचे नेतृत्व करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.