
श्रीपाद कोठे
नागपूर
एकात्म मानववादाचा विचार मांडणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अर्थकारणाचाही मौलिक विचार समाजासमोर ठेवला होता. अर्थकारण आणि पर्यावरण असा जो संघर्ष आज पाहायला मिळतो त्याची सुरुवातही त्यांच्या हयातीत झाली नव्हती. पर्यावरण हा विषय चर्चेत सुद्धा नव्हता. त्याचवेळी सूत्ररुपात त्यांनी या विचाराचा श्रीगणेशा केला होता.
लोकांचे भरणपोषण, जीवनाचा विकास, तसेच राष्ट्राची धारणा आणि विकास; यासाठी आवश्यक अशा गोष्टींचे उत्पादन हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक लक्ष्य असायला हवे असे त्यांचे मत होते. अर्थात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा; या गोष्टींना सर्वोच्च प्राथमिकता त्यांना अपेक्षित होती. सगळ्यांच्या या सगळ्या गरजा पूर्ण करणे हे अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे यावर त्यांचा भर होता. इच्छा वाढवीत जाणे आणि मग त्या पूर्ण करण्याची धावाधाव त्यांना अपेक्षित नव्हती. स्वाभाविक गरजा आणि इच्छा यांच्या पूर्तीसाठी उत्पादन करणे योग्य; तर उद्योगांनी त्यांना वाटते म्हणून तयार केलेल्या उत्पादनांसाठी इच्छा तयार करणे अयोग्य, असा दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार होता. बाजारासाठी उत्पादन करणे ठीक पण उत्पादनासाठी बाजार नको अशी त्यांची भूमिका होती. त्यांचा हा विचार हास्यास्पद वाटू शकतो. न रुचणारा आणि न पटणाराही वाटू शकतो. मात्र आज जगभर सुरु असलेल्या पर्यावरण चळवळी; जगासमोर उभे राहिलेले पर्यावरण संकट, हवामान बदलाचे विषय, मानवी आरोग्याचे विषय, मनोरोगांचे प्रमाण, मानवाला व्यापू लागलेली निरर्थकता यांच्यामुळे; जबरदस्तीने का होईना; अनिच्छेने का होईना; इच्छांच्या, उत्पादनांच्या आणि उपभोगांच्या निरंतर वाढीचा पुनर्विचार करायला मानवाला भाग पाडले आहे.
स्व. उपाध्याय यांच्या दृष्टीला मात्र हे सारे त्याच वेळी स्पष्ट झाले असावे. त्यामुळेच १९६५ सालच्या मुंबईतील आपल्या भाषणात, स्वाभाविक इच्छानुगामी उत्पादनाचा विचार मांडल्यानंतर त्यांनी प्रकृतीची चर्चा केली आहे. उत्पादनाचा संबंध प्राकृतिक संसाधनांशी आहे. त्यांचा अंदाधुंद वापर किती दिवस चालू शकेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. प्रकृतीत उपलब्ध असलेले एक साधन संपल्यास दुसरे साधन शोधून काढता येईल. पर्याय विकसित करता येतील असा तर्क उपभोगवादी देत असतात. या तर्काचाही समाचार त्यांनी या भाषणात घेतला आहे. या तर्कातील शक्ती मान्य करूनही, प्रकृतीची काही ना काही मर्यादा असणारच याकडे दुर्लक्ष करता येणार नाही याकडे लक्ष वेधून, संसाधनांच्या अनावश्यक वापराने एक दिवस पश्चात्ताप करावा लागेल असा इशाराही श्री. दीनदयाळ उपाध्याय यांनी दिला होता. आज आम्ही त्या पश्चात्तापाच्या बिंदूशी आलो आहोत. त्यामुळेच, विकसनशील देशातील लोक जास्त खाऊ लागल्याने जगात अन्नसमस्या निर्माण झाल्यासारखी विधाने जाणतेही करू लागले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा यांचीही पूर्तता करताना आज सगळ्यांची दमछाक होते आहे. पाण्याची समस्या ज्या अक्राळविक्राळ स्वरुपात आज जगापुढे उभी झाली आहे; तिने संसाधनांचे पर्याय शोधण्याचा मानवी उन्मत्ततेचा दांभिक तर्क पार हवेत भिरकावून दिला आहे.
परंतु दीनदयाळ उपाध्याय यांचे द्रष्टेपण इथेच संपत नाही. याच विषयाचे विवेचन पुढे नेताना ते म्हणतात – `प्रकृती की संपदा की मर्यादा की चिंता न भी करे तो कम से कम इतना तो हमे मानना ही पडेगा कि प्रकृती मे विभिन्न वस्तूओं के बीच एक परस्परावलंबी संबंध है. आज की अर्थव्यवस्था और उत्पादन की पद्धती इस सामंजस्य को बडी तेजी से बिगाडती जा रही है. परिणामत: जहां एक ओर हम नयी नयी इच्छाओं की पूर्ती के लिये नये नये साधन ढुंढ रहे है वहां दुसरी ओर नये नये प्रश्न हमारी संपूर्ण सभ्यता और मानवता को समाप्त करने के लिये पैदा होते जा रहे है. यह विनाशलीला कब तक चलती रहेगी?’ दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्या परस्परावलंबीत्वाकडे या ठिकाणी लक्ष वेधले आहे; ते आज त्यानंतर ५० वर्षांनी अधिक स्पष्टपणे जाणवू लागले आहे. हे परस्परावलंबीत्व केवळ माणूस आणि निसर्ग एवढेच नाही, तर मानवाचे स्वत:चे एकूण मानवी विश्व आणि व्यक्तीव्यक्तीचे स्वतंत्र बाह्य आणि आंतरिक विश्व; यांचेही परस्परावलंबीत्व बिघडून गेलेले आणि त्याच्या अस्तित्वालाच आव्हान देत असलेले प्रत्ययाला येते आहे. देशादेशांच्या सुरक्षेपासून, सायबर घोटाळे आणि सायबर गुन्ह्यांपर्यंत; कौटुंबिक आणि व्यावसायिक सुरक्षेपासून, आत्महत्या आणि हत्यांपर्यंत; मनोविकृतींपासून, विकृत, अतिरेकी आणि ओहोटीला लागणाऱ्या कामभावनेपर्यंत; अक्षरश: मानवी जगण्याच्या सगळ्या अंगांमध्ये, सर्व स्तरावर हे परस्परावलंबन बिघडलेले पाहायला मिळते. त्यातील दुर्दैवाचा भाग हा की, या अर्थव्यवस्थेचे उत्पादन आणि उपभोग घेणाऱ्या; या उत्पादन आणि उपभोगाची कमतरता नसलेल्या लोकांमध्येही मोठ्या प्रमाणावर केवळ हे परस्परावलंबनच नाही, तर आत्मावलंबन देखील वेगाने ढळल्याचा आणि ढळत असल्याचा अनुभव आज सगळे घेत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने का होईना, हास्यास्पद वाटणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांकडे गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत ते लिहितात, ‘वास्तविक निसर्गापासून आपण एवढीच साधनसामुग्री व तीही अशाप्रकारे घ्यावी, की झालेली झीज निसर्ग स्वतःच भरून काढू शकेल. उदाहरणार्थ – झाडापासून पाने घेतल्याने झाडाची हानी होत नाही उलट लाभ होतो. परंतु जमिनीपासून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या लोभापायी आपण असे प्रयोग करीत आहोत, की ज्यामुळे काही काळानंतर जमिनीची उत्पादनक्षमता संपून जाईल. कारखानदार मशीन वगैरेसाठी घसारा निधीची व्यवस्था करतात. निसर्गाच्या या कारखान्यासाठी मात्र आपण कसल्याही घसार्याची तजवीज करीत नाही. हे कसे चालेल? यादृष्टीने विचार केला तर असे म्हणावे लागेल की, आपल्या अर्थव्यवस्थेचा उद्देश अमर्याद उपभोग हा न ठेवता, संयमित उपभोग हाच असला पाहिजे. निसर्गाच्या स्तनातून दोहन करून आपण जगावे, शोषण करून नव्हे.’ (पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन, पृष्ठ ४५७)
दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्या घसाऱ्याची चर्चा केली त्या दिशेने काही प्रयत्न त्यांच्या नंतरच्या काळात झाले. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, मानवी अर्थव्यवस्थेचा घसारा आणि निसर्गाचा घसारा वेगळा राहील. पैसा ही व्यवहार चालवण्यासाठीची मानवनिर्मित गोष्ट आहे. झालेले नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न आणि पर्याय माणसाला पैशाच्या साहाय्याने प्राप्त होऊ शकतात. यंत्रसामुग्रीची दुरुस्ती वा नवनिर्मिती पैशाच्या साहाय्याने होऊ शकते. परंतु निसर्गाचे नुकसान आणि झीज पैशाच्या साहाय्याने भरून निघू शकत नाही. एखादा मोठा वृक्ष तोडल्याने होणारे फळांचे, सावलीचे, प्राणवायूचे, जमिनीची धूप थांबवण्याचे, कार्बन डाय ऑक्साईडच्या शोषणाचे होणारे नुकसान; पैसा वा पैशाने लावलेल्या छोट्या रोपांनी होऊ शकत नाही. निसर्गाचे काही ना काही नुकसान केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही हे खरे आहे. परंतु हे नुकसान निसर्गाचा अंगभूत वेग आणि नुकसान भरून काढण्याची अंगभूत प्रक्रिया यांच्याशी मेळ खाणारे असले पाहिजे. निसर्गाचा अंगभूग वेग आणि निसर्गाची अंगभूत प्रक्रिया माणसाला अजून फारशी आकलन सुद्धा झालेली नाही. त्यामुळे आपला उपभोगाचा वेग कमी करणे, आपली उपभोगाची इच्छा आणि पद्धत निसर्गाच्या अनुषंगाने बेतणे; हाच पर्याय मानवाला खुला आहे. भौतिक सुखसोयी आणि साधने ज्यांना उपलब्ध नाहीत वा किमान प्रमाणात उपलब्ध नाहीत, त्यांचा विचारही क्रमप्राप्त ठरतो. अशा कोट्यवधी लोकांना चांगले मानवीय जीवन जगता यायलाच हवे. त्यासाठी जमिनीसह अन्य नैसर्गिक साधनांचा वापर करावाच लागेल. या दोहोंचा मेळ कसा घालायचा? यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे – साधनसंपन्न मानवांनी आपल्या इच्छा आणि गरजा नियंत्रित करणे आणि आपल्याकडील अधिकची साधने आणि संपत्ती यांच्यावरील आपला हक्क सोडणे. ती साधने आणि संपत्ती ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे. विविध सामाजिक व्यवस्था आणि सरकारे यांनी साधनांची नासाडी थांबवण्याला प्राधान्य देणे. यात विविध देशांच्या सुरक्षेचा प्रश्नही अंतर्भूत करावा लागेल. साधनसंपत्तीची नासाडी थांबवणे आणि त्यांचे योग्य वितरण आणि विभाजन यासाठी नवीन मानवी मूल्ये प्रस्थापित करावी लागतील. असा सर्वंकष विचार केल्याशिवाय निसर्गाचे रक्षण, संवर्धन आणि सातत्य साध्य करता येणार नाही.
आवश्यक आणि संयमित उपभोग, बचत, पर्यावरणाचे शोषण न करता दोहन; यावर अर्थव्यवस्थेत भर असावा असे दीनदयाळ उपाध्याय यांचे मत होते. आमचा उद्देश्य मानवीय असेल तर आर्थिक प्रश्नांकडे पाहण्याची आमची दृष्टी आमुलाग्र बदलून जाईल असे मत व्यक्त करतानाच ते म्हणतात; भांडवलवादी व समाजवादी दोन्ही विचार `मूल्य’ या बाबीला अतिशय महत्व देतात. परंतु केवळ `मूल्य’ या गोष्टीला महत्व देणारी जीवनदृष्टी अपुरी, अमानवीय आणि नीतीशून्य असते. ही मानवीय दृष्टी कशी असू शकते याची चर्चा करताना त्यांनी `कमानेवाला खायेगा’ या घोषणेची चर्चा केली. श्री. उपाध्याय म्हणतात – ही घोषणा चुकीची आहे. `कमानेवाला खिलायेगा’ व `जन्मा सो खायेगा’ अशा घोषणा हव्यात. आपला विचार स्पष्ट करताना ते मुंबईच्या भाषणात म्हणतात – `खाने का अधिकार जन्म से प्राप्त होता है. कमाने की पात्रता शिक्षा से आती है. समाज मे जो कमाते नही, वे भी खाते है. बच्चे, बुढे, रोगी, अपाहीज, सबकी चिंता समाज को करनी पडती है. प्रत्येक समाज इस कर्तव्य का निर्वाह करता है. मानव की सामाजिकता और संस्कृती का मापदंड इस कर्तव्य के निर्वाह की तत्परता ही है. इस कर्तव्य के निर्वाह की क्षमता पैदा करना ही अर्थव्यवस्था का काम है.’ अर्थकारणाच्या मानवीयतेचा अतिशय नेमका आणि सुस्पष्ट दृष्टीकोन श्री. उपाध्याय मांडतात.
जागतिकीकरणाच्या भांडवलशाही पद्धतीने आज या मानवीयतेची केलेली मोडतोड माणूस अनुभवतो आहे. अगदी लग्नाच्या बाजारात सुद्धा लग्नाळू मुले मुली निर्णय घेताना जी चर्चा करतात त्यात, `तुझं तू, माझं मी’ अशा चर्चेपर्यंत आलेली आहेत. त्याचे त्यांना आणि समाजालाही काही वाटेनासे झाले आहे. आमच्या करातून समाजाची सेवा कशाला, असा प्रश्न करदाते विचारू लागले आहेत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबीत्वाचा विषयही या अंगाने विचार करण्यासारखा आहे. महिलांच्या सामाजिक स्थितीची चर्चा, तिची सुरक्षा आणि तिचे सुखी जगणे; यांचा विचार व्हायलाच हवा. परंतु त्यातून सहकार्य आणि परस्परावलंबित्व यांना व्यवहारात आणि सिद्धांत म्हणून धक्का लागू नये हेही पाहायला हवे. मागे एका उच्च न्यायालयाने पती आणि पत्नी यांनीही आपल्या atm चे पिन क्रमांक एकमेकांना सांगू नये, असा आदेश दिला होता. मानवी स्वभाव आणि वृत्ती पाहता पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही गैरफायदा घेऊ शकतातच. पण न्यायालये जेव्हा याबाबत निर्णय आणि आदेश देतात तेव्हा मानवी जगण्यातील परस्परावलंबित्व बाधित होऊ लागते.
अर्थकारणाचा अर्थकारण म्हणून जीवननिरपेक्ष विचार कसा रसातळाला नेणारा ठरतो हे आज वेगळे सांगण्याची गरज नाही. एवढेच नाही तर केवळ आर्थिक विचारविनिमय, अर्थशास्त्रीय विचार करून; जीवन तर दूरची बाब पण अर्थकारणही चालवता येणार नाही; असे मत आज अर्थतज्ञ व्यक्त करू लागले आहेत. स्व. दीनदयाळ उपाध्याय यांनी पाच दशकांहून अधिक काळापूर्वी या विषयाकडे लक्ष वेधलेले दिसते. श्री. उपाध्याय यांनी चर्चा केलेली मानवीयता आणि आज प्रचलित सामाजिकता यात फरक आहे. अनेक व्यक्तींचा समूह म्हणजे समाज आणि समाजाला पर्याय नसल्याने नाईलाज म्हणून एकमेकांसाठी कर्तव्य भावनेने, करार पद्धतीने काही करणे; जबाबदारी पार पाडणे; हा आजच्या सामाजिकतेचा आशय आहे. Corporate social responsibility हा अलीकडचा प्रकार यातीलच. कायद्याने सक्ती केल्याने समाजसेवा करणे. त्यात मानवीयता नाही. श्री. दीनदयाळ उपाध्याय यांनी ज्या मानवीयतेची अपेक्षा व्यक्त केली ती मानवीयता म्हणजे; व्यक्तीच्या सदवृत्तींचा विकास होय. सदवृत्तींचा हा विकास अर्थकारणाला योग्य आकार आणि दिशा देईल; तसेच अर्थकारणाने या सदवृत्तींना पोषक असावे; हा स्व. उपाध्याय यांचा अभिप्राय होता.