

नक्षलविरोधी लढ्याला ऐतिहासिक वळण
गेली अनेक वर्षे गोरगरिबांच्या हक्काची लढण्याचा दावा करणारी नक्षलवादी चळवळ बंदुकीच्या टोकावर दहशत पसरविणारी टोळी केव्हा झाली कळलेच नाही. वंचितांच्या हक्काच्या बाता हवेत विरल्या अन् ही चळवळ त्याच गरीब, आदिवासी, वंचितांच्या जीवावर उदार झाली. सरकार सोबतच या आदिवासींचा गळा घोटू लागली. लोकांचे जीव घेणे हा तिचा धंदा झाला. हळूहळू सरकारी यंत्रणा या चळवळीत विरुद्ध दंड थोपटून उभी राहिली. सुरुवातीला जीवाला घाबरणारे लोकही आता जागृत होत या चळवळीत विरुद्ध व्यक्त होऊ लागले. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता हे व्यक्त होणे कृतीतून झळकू लागले आहे. परवा गडचिरोली जिल्ह्यातील सात गावातील नागरिकांनी एकत्र येऊन घेतलेला, नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा त्याचाच प्रत्यय आहे. (Entry of Naxalites banned in seven villages)
गेल्या ४० वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या दहशतीत जीवन जगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील ७ दुर्गम गावांनी नक्षलवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील या गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव घोडराज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सादर केला.
मागील तीन वर्षांमध्ये गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे आयोजित केले. येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाप्रती गावकऱ्यांचा विश्वास दृढ झाला. अलीकडील काळात या परिसरात इरपनार येथे ‘मोबाईल टॉवर ‘ची उभारणी करण्यात आली. सात गावांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयासाठी उपअधीक्षक अमर मोहिते, घोडराजचे प्रभारी अधिकारी शरद काकळीज यांनी पुढाकार घेतला.
ही सातही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अबुझमाड परिसराला लागून आहेत. या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते, तसेच गावातील काही नागरिकांचा नक्षलवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास अडचणी येत होत्या. नक्षलवाद्यांकडून पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून निष्पाप गावकऱ्यांची हत्या व मारहाण केली जात होती. नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकासकामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखवण्यात येणारा धाक आदी घटनांमुळे नक्षलवादी जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. इतर गावांनीही निर्भयपणे विकासाची वाट निवडावी. ..
कोणत्याही नक्षलवाद्यास जेवण, रेशन, पाणी गावकऱ्यांमार्फत दिले जाणार नाही. त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही. गावातील नागरिक स्वतः किंवा त्यांच्या मुलाबाळांना नक्षलवादी संघटनेत सहभागी करून घेणार नाही. त्यांचे कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांचे प्रशिक्षण करणार नाही. नक्षलवाद्यांच्या बैठकीला जाणार नाही. त्यांच्या खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे ठरावात म्हटले आहे. धोडराज हद्दीतील गावांनी नक्षल गावबंदी केल्यामुळे मिडदापल्ली गावातील नागरिकांनी जंगल परिसरात पोलीस पथकासाठी केलेले खड्डे बुजवून त्यातील लोखंडी सळाखी काढून पोलिसांना दिल्या. इतर गावातील नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
People from seven villages in the district have come together to stop Naxals from entering their villages. These villages are Parayanar, Nelgunda, Kucher, Kawande, Gongwada, Mundapalli, and Mahakapadi. During an agricultural event, villagers gave copies of their decision to the police at Dhodraj Station