विदर्भाच्‍या नाट्य व उद्योग क्षेत्राची मोठी हानी; उद्योजक अजित दिवाडकर यांचे निधन

0

उद्योजक अजित दिवाडकर यांचे निधन
विदर्भाच्‍या नाट्य व उद्योग क्षेत्राची मोठी हानी

दिवाडकर्स अजित बेकरीचे संचालक व ज्‍येष्‍ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्‍यूसमयी त्‍यांचे वय 80 वर्षांचे होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी निलिमा, मुलगा विक्रम, सून मीरा, मुलगी अवंती व जावई अभिराम देशमुख व बराच आप्‍तपरिवार आहे. त्‍यांची अंत्‍ययात्रा 50, नवजीवन कॉलनी, माधव नेत्रालयाजवळ, वर्धा रोड या त्‍यांच्‍या राहत्‍या घरून बुधवारी सकाळी 9.30 वाजता निघेल. अंबाझरी घाटावर त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत.
लहानपणापासूनच नाट्यकलेची आवड असणा-या अजित दिवाडकर यांनी वडील प्रभाकर दिवाडकर याच्‍या दिग्‍दर्शनात अनेक नाटकांमध्‍ये भूमिका केल्‍या होत्‍या. उत्‍तम निरीक्षण क्षमता व अभ्‍यासू वृत्‍ती यामुळे त्‍यांचा अभिनय बहरतच गेला. पूर्वीच्‍या धनवटे रंगमंदिरमध्‍ये त्‍यांचा कॅन्‍टीनचा व्‍यवसाय करत असतानाच त्‍यांच्‍या नाट्य प्रवासही दमदारपणे सुरू राहिला. महाविद्यालयात शिकत असताना अनेक नाटकांमध्‍ये भूमिका करणा-या अजित दिवाडकर यांनी मेरु मंदार धाकुटे, रुद्रवर्षा, वेदनेचा वेद झाला, होती एक शारदा, बुद् विराम, बॅरिस्‍टर अशा अनेक दर्जेदार नाटकांमध्‍ये भूमिका केल्‍या व पारितोषिकेही पटकावली. आकाशवाणी, दूरदर्शनवरील अनेक श्रुतिकांमध्‍ये त्‍यांनी काम केले.
1955 साली अजित बेकरी सुरू करणा-या दिवाडकर यांनी अतिशय कष्‍टाने हा व्‍यवसाय उभा केला आणि नावारुपाला आणला. त्‍यांना जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे उद्योग क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामग‍िरीसाठी सन्‍मानित करण्‍यात आले. व्‍यवसाय सांभाळत असतानाच त्‍यांनी नाटक, वाचन, अभिवचन, क्रिकेटाचाही छंद जोपासला. नाट्यकर्मी व उद्योजक असलेल्‍या अजित दिवाडकर यांच्‍या अचानक जाण्‍याने नाट्यक्षेत्र व व्‍यवसाय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.