Engineer’s Day 2024 :अभियांत्रिकी…!

0

किती सोप्पं वाटतं नं, बटण दाबायचा अवकाश, लख्ख प्रकाश पडतो, गार हवेची झुळूक येते, पटकन चटणी तयार होते, कपडे धुतले जातात…फ्रिज, रेडिओ, टीव्ही, उपग्रह…..
काय काय नि काय काय…या सहज सोप्या सुलभ गोष्टी घडतात खर्‍या, पण त्यामागे केवढ्या जगङव्याळ घडामोडी घडवल्या जात असतात? हे फक्त विजेबद्द्ल झालं! फ्लाय ओव्हरवरून गाडी सुसाट निघते ती गाडी असो, की बांधलेला पूल सगळी करामत अभियांत्रिकीची असते!

बसलेल्या जागेवरून सभोवताली दृष्टी फिरवली तरी प्रत्येक अचेतन, निर्जीव वस्तू, पदार्थ हे अभियांत्रिकीची साक्ष देते. घराच्या भिंती पासून ते भांड्यांपर्यंत, भिंतीवर टांगलेल्या घड्याळापासून ते बागेतील घसरगुंडीपर्यंत, अडकित्ता ते आगगाडी, बादली ते बटणापर्यंत, रूमालापासून ते रणगाड्यापर्यंत साणशीपासून संगणकापर्यंत, खिळ्यापासून खगोलीय तंत्रज्ञानापर्यंत केवळ आणि केवळ विविध प्रकारच्या अभियांत्रिकीचा प्रत्यय येतो. वैद्यकीय अभियांत्रिकी असो, की नुकतेच आलेले ए.आय. तंत्रज्ञान असो मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या ( काहींना हे नाव उच्चारणे सुद्धा अंमळ अवघडच जाते, पण ते असो…) या महान अभियंत्याचे स्मरण त्या निमित्ताने का होईना केले जाते! स्थापत्य, विद्युत, संगणक, यांत्रिकी, वास्तुशिल्पशास्त्र अशा असंख्य शाखांमध्ये हे शास्त्र विभागलेले आहे.

आरोग्य जपणारे वैद्यकीय क्षेत्र, दैनंदिन हिशेब किंवा आखणी करणारे प्रशासकीय, आर्थिक संरचना, देखभाल करणारे क्षेत्र वा अशी अनेक इतर क्षेत्रे महत्वाचीच असतात. पण आजूबाजूला केवळ एक दृष्टीक्षेप टाकला आणि त्या त्या वस्तूच्या मूळापर्यंत गेलो, तर अभियांत्रिकी ज्ञानाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही…!

१५ सप्टेंबर १८६० हा सर विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस.

ते दोन पेन वापरत. एक सरकारी कामासाठी व दुसरा खासगी कामासाठी. एवढी नि:स्पृहता आज दुर्मिळ झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. कुशल अभियंता म्हणून जगभर नावलौकिक कमावल्यानंतर त्यांना म्हैसूर संस्थानांत दिवाण पद मिळाले. पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींना चहापानाच्या निमित्ताने घरी बोलावले. समारंभ संपल्यावर सर्वांना सांगितले, ‘माझी तुम्हाला एक प्रेमळ विनंती आहे. मी या पदावर असेपर्यंत आपली वैयक्तिक स्वरुपाची कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका, परिचय आहे म्हणून कोणतेही अवैध काम होईल अशी माझ्याकडून अजिबात अपेक्षा ठेवू नका..’
शतकाचा स्थापत्य शास्त्राचा जादूगार, ‘भारतरत्न’ या पदाचा गौरव वाढविणारा नक्कीच आहे!

दिलीप रा. जोशी, नाशिक (Dilip Ra. Joshi, Nashik)