

ठाणे (Thane) :- रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेच्या सावळ्या गोंधळाचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसात मध्य रेल्वेच्या समस्या वाढतच जातात. आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागणार आहे. डोंबिवली आणि कल्याणदरम्यान एका एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेवरील (Central Railway) डोंबिवली स्थानकादरम्यान एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिन्स या ठिकाणाहून निघालेल्या एका एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये मोठा बिघाड झाला आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस ठाकुर्ली स्थानकात थांबवण्यात आली आहे. यामुळे या गाडीच्या मागून येणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांचा खोळंबा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एक्सप्रेस गाडी लोकमान्य टिळक टर्मिन्सवरुन रवाना झाली होती. त्याच वेळी अचानक या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. याबद्दलची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ठाकुर्लीच्या दिशेने नवीन इंजिन रवाना केले आहे. हे नवीन इंजिन त्या गाडीला लावले जाणार आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.