पती-पत्नीच्या भांडणामुळे विमानाचे इमरजन्सी लँडींग!

0

(New Dellhi)नवी दिल्ली-अनेकदा सुरक्षा, वैद्यकीय आणिबाणीच्या परिस्थितीमुळे विमानाचे आकस्मिक लँडींग करावे लागते व अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र, पती-पत्नीचे भांडण विकोपाला जाऊन विमानाचे आकस्मिक लँडींग करावे लागल्याची घटना घडली. म्युनिचहून बँकॉकला जाणाऱ्या विमानाचे दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लँडींग करावे लागले. (Emergency Landing of International Flight)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लुफ्थांसा या कंपनीच्या या विमानातून प्रवास करणाऱ्या एका जोडप्यात काही कारणावरून वाद झाले. या प्रकरणी संबंधित महिलेने वैमानिकाकडे तिच्या पतीची तक्रार केली. या महिलेचा पती तिच्याशी असभ्य वर्तन करत असून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले. यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. या महिलेवर तिच्या पतीने अन्न पदार्थ फेकले, तसेच तिचे पांघरूण जाळण्याचा प्रयत्न केला. या नंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वैमानिकाने दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधत तेथे विमान उतरविण्याची परवानगी मागितली. दिल्लीत विमान उतरविल्यानंतर या महिलेच्या पतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या ताब्यात देण्यात आहे. संबंधित व्यक्ती हा जर्मनीचा नागरिक असून महिला ही थायलंडची नागरिक आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की महिलेच्या पतीने माफी मागितल्यावर त्याला जर्मन दुतावासाच्या ताब्यात द्यायचे की थेट जर्मनीला पाठवायचे, याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.