
जालना : ओबीसींमधून मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मागणी सुरु असताना त्याला विरोध करण्यासाठी आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या बालेकिल्ल्यात जालना येथील अंबडमध्ये ओबीसींची जाहीरसभा (OBC Save Reservation Rally in Ambad) होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातील ओबीसी नेते व कार्यकर्ते जालन्यात दाखल झाले आहेत. सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह भाजप नेत्या भाजप नेत्या पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या जाहीरसभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहेत. या जाहीरसभेच्या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय सर्वच प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये, बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी, खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, 7 सप्टेंबर 2023 रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा, बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचं वाटप करावं, धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागण्या जाहीर सभेत केल्या जाणार आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सुरुवात जालन्यातील आंतरवाली सराटी गावातून झाली. आता ओबीसींची सभा देखील जालना जिल्ह्यातच अंबड येथून होत आहे. आंतरवली सराटी गावापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर ही सभा होणार आहे. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे व मराठा आंदोलकांना संदेश देण्याचा ओबीसी नेत्यांचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
राज्यातील सर्वच मराठ्यांना ओबीसींमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे.