निवडणूक आणि मांसाहारी जेवणाच्या खानावळी

0

नागपूर (Nagpur) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग धरला आहे. प्रत्येक पक्षांचे उमेदवार जनसंपर्कावर भर देत आहेत. त्यांच्या दिमतीला कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा असल्याचे दिसत आहे. कार्यकर्ते आणि वस्त्यांमधील युवा वर्गाची साथ असल्याशिवाय जिंकून येणे शक्य नाही याची जाणीव उमेदवारांना आहेच. त्यामुळे कार्यकर्त्यांना विशेष सुविधा पुरविणे त्यांचे चोचले पूर्ण करणे उमेदवारांना बंधनकारक झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आता वस्त्या वस्त्यांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पंगत्यांची रेलचेल सुरू झाली आहे. याशिवाय काही खास कार्यकर्त्यांना एखाद्या चांगल्या सावजी हॉटेलमध्ये जेवणाची सुविधा पुरवली जात आहे.

नागपुर शहरात एकूण सहा मतदारसंघ असून सर्व मतदारसंघात ११७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते शेकडोच्या घरात जातात. दिवसभर प्रचार, निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज प्रत्येक उमेदवारांना असते. मग त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील उमेदवारांना त्यांच्या खिशातूनच करावी लागते. प्रचाराच्या रणधुमाळीतशहरातील सहाही मतदारसंघांत विविध पक्षांत प्रवेश, समर्थन, मांसाहारी आणि शाकाहारी जेवणावळी तथा दिवाळी फराळ, चहा, नास्त्यांच्या कार्यक्रमांना जोर आला आहे. यासाठी प्रत्येक वॉर्ड आणि प्रभागांत उमेदवाराने प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. त्यांच्याच माध्यमातून या सर्व जेवणावळीचे कार्यक्रम आखले जात आहेत.

सावजी हॉटेल्स फुल्ल

सामान्य कार्यकर्ते वगळता काही खास कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांनी विशेष सोय केली आहे. विशेष म्हणजे नागपूरकर म्हटले तर पहिली पसंती दिली जाते सावजी हॉटेल्सना. त्यामुळे साहजिकच खास कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांकडून सावजी हॉटेल्स आरक्षित केले जात आहेत. कार्यकर्त्यांनी उमेदवारांकडून मिळालेले कुपन हॉटेल मालकाकडे जमा करायचे आणि मनसोक्तपणे मांसाहारी जेवणावर ताव मारावा. नागपुरात जवळपास २००च्या वर छोटे मोठे हॉटेल्स आहेत. सरासरी दररोज एका हॉटेलमध्ये दोनशे ताट वाढले जाते. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत आता या हॉटेल्समध्ये ५००च्या वर ताट वाढण्याची सोय हॉटेल्स मालकांनी केली आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या रेलचेलीमुळे सामान्य ग्राहकांना बसण्यासाठी जागाही मिळत नसल्याची एका सावजी हॉटेल मालकाने दिली.