

नागपूर(Nagpur) -पूर्व विदर्भातील पहिला टप्प्यात येत्या शुक्रवारी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या 5 लोकसभा मतदारसंघांतर्गत दुर्गम अशा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. माओवादग्रस्त भागातील 68 मतदान केंद्रावरील पथकांना मंगळवारी आणि आज बुधवारी वायुदलाचे हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येत आहे.
अहेरी येथून वायुदलाच्या पाच हेलिकॉप्टरने या अधिकारी कर्मचाऱ्यांना बेस कॅम्पवर पोहचवले जात आहे. एकीकडे छत्तीसगढमधील कारवाईत 29 माओवादी चकमकीत काल ठार झाले तर तीन जवान जखमी झाले, या पार्श्वभूमीवर निवडणूक राष्ट्रीय कर्तव्याला प्रशासनातर्फे दिले जाणारे महत्त्व यातून अधोरेखित झाले आहे. दक्षिण गडचिरोलीतील अहेरी, भामरागड, एटापलली,सिरोंचा या चार तालुक्यातील 72 मतदान केंद्र ही अति संवेदनशील आहेत. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीत हेलिकॉप्टर दाखल झाले.
अहेरीच्या शंकरराव बेजलवार महाविद्यालयाच्या पटांगणावर वायुदलाचे थ्री एमआय 17 आणि 4 एएलएचडी हेलिकॉप्टरने टप्प्याटप्प्याने या मतदान पथकांना ईव्हीएम आणि इतर साहित्य देऊन बेस कॅम्पवर पोहोचवण्याचे काम कालपासून सुरू झाले. यात 295 मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. माओवाद्यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीवर बहिष्कारचे आवाहन केले आहे हे विशेष.