मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. (Uddhav Thackeray) निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सध्याचा निवडणूक आयोग बरखास्तच केला पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अयोग्य असून असा निवडणूक आयोग बरखास्त करावा. न्यायालयात त्यांची मनमानी चालणार नाही, असे ते म्हणाले. देशात चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहेत. जी परिस्थिती आज शिवसेनेवर आहे ती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर असेल. याचा सामना आता केला नाहीत तर कदाचीत येणारी २०२४ ची निवडणूक शेवटची असावी. कारण त्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. सध्या सर्वात कठीण प्रसंग आहे. आता जर आपण जागे झालो नाही तर हुकुमशाही येईल, असेही ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं, नितीश कुमार यांचे फोन आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.














