अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त – समुद्रपूर तालुक्यातील बोर नदीपात्रातील घटना

0

वर्धा(Wardha)जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पारडी आणि उमरा येथील वाळू घाटावर पोलिसांनी छापा मारला असता, बोर नदीपात्रातून जेसीबी अन् पोकलॅन्डच्या साहाय्याने वाळूचा वारेमाप उपसा करताना वाळू तस्करांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (२१ मे) मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण(Rahul Chavan) यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी १२ तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आठ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन कोटी ६० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सतीश वाघमारे (रा. सेलू), अरविंद गांडगे, सूरज दाते (रा. हिंगणी), चंद्रकांत साखरे (रा. येराखेडी), संदीप रामदास मडावी (रा. धनोली मेघे), संजय ससाने (रा. पारडी), महेश बेहरे (रा. दहेगाव), निकेस गहुकर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर भूषण वाघमारे (रा. सेलू), सूरज होले (रा. वर्धा), नामदेव गोडामे (रा. सालई पेवट), निखिल रोकडे (रा. सिंदी), निखिल गोडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वाळू घाटावर छापा मारून पोलिसांनी दहा चाकी टिप्पर (एमएच. ३२ एजे. ५५८८), टिप्पर (एमएच. ३२ एजे. ३३८८), टिप्पर (एमएच. ३२ एजे. ७१६२), दोन जेसीबी (एमएच. ३२ एजे. १००६, एमएच. ३१ सीबी. ६०३०) तसेच विना क्रमांकाचा पोकलॅन्ड, आणि एक चारचाकी (एमएच. ३२ एएस. ७७६६) असा एकूण २ कोटी ६० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, आर्थिक गुन्हे शाखेचे कांचन पांडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, रामदास दराडे, भूषण हाडके यांच्यासह पोलिस मुख्यालयातील एक पथक आणि आरसीपी पथकाने केली.