

नागपूर (nagpur),
ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या प्रवासी महासंघाने ‘संवाद समन्वयात ग्राहक कल्याण’ या कार्यक्रमांतर्गत नागपूरचे परिवहन उपायुक्त किरण बिडकर आणि सहायक अधिकारी मनोज ओतारी यांच्याशी चर्चा करून ग्राहक समस्यांबाबत चर्चा केली आणि त्या तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, प्रवासी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष नितीन मुकेवार, जिल्हा सचिव मुकुंद अडेवार आणि ग्रामीण संघटक श्रीराम सातपुते यावेळी उपस्थित होते.
ग्राहक समस्यांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या मार्गी लावण्याचा एक उपक्रम ग्राहक पंचायत महाराष्ट्र राबवीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून हे चर्चासत्र होते.
यात विशेषतः समृद्धी मार्गावर गाड्या उभ्या करून जेथे चेकिंग होते, तेथे स्वच्छतागृह आहे; पण पाणी आणि लाईट नाही. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.
नागपूर शहरातील ऑटो मीटरनुसार चालत नाही, ऑटो चौका चौकामध्ये टर्निंगला उभे करतात, अशा अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. ओला आणि उबेर टॅक्सी मध्ये एसी चालवणं हे अनिवार्य असलं पाहिजे, नागपूर शहरांमध्ये काही ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत ते चुकीच्या जागेवर असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतात त्यावर लक्ष देणे, गाडीची स्पीड किती ठेवावी यासाठी अनेक ठिकाणी बोर्ड लावणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाच्या बसेस पास करीत असताना सर्व अटी व शर्ती सारख्याच असाव्यात. सीटिंग अरेंजमेंट बरोबर नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या चालकाला गाडी चालवत असताना भरपूर कसरत करावी लागते, याकडे विशेष लक्ष देणे.
शासकीय व निमशासकीय जुन्या गाड्या आहेत ज्याला सीट बेल्ट नाही अश्या गाड्यांना सीट बेल्ट सिस्टीम लावून असावी. अन्यथा अशा प्रकारच्या जुन्या गाड्या आरटीओकडून चालान कराव्यात . खाजगी ट्रॅव्हल्सच्या दरवाढीकडे आरटीओने कटाक्षाने लक्ष द्यावे आदी विविध समस्यांवर चर्चा झाली. या समस्या सोडविण्याचा निश्चित प्रयत्न होईल, असे आश्वासन आरटीओ पदाधिकाऱ्यांनी दिले आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल संघटनेचे आभार मानले.