ई-मार्केट प्लेस राबवणार डिजीटल साक्षरता उपक्रम

0

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ 2025’ ‘जीईएम’वर परिषद

नागपूर (nagpur), 9 फेब्रुवारी
गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (जीईएम) हे फार वापरानुकूल असून ई-कॉमर्ससाठी लवकरच डिजीटल साक्षरता उपक्रम राबविण्यात येणार आहे. जेणेकरून सर्व वयोगटातील, विशेषत: ज्येष्ठ व्यावसायिकांसाठी ही प्रक्रिया हाताळणे सुलभ होईल, असे प्रतिपादन जीईएम, नवी दिल्लीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित चव्हाण यांनी येथे केले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्‍सवात ‘गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस’ वरील परिषदेत ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे आणि वेदचे प्रशांत उगेमुगे प्रामुख्याने उपस्थित होते.

अजित चव्हाण म्हणाले, जीईएममुळे राज्य व पंचायत सरकारच्या मदतीने 4 लाख करोडचा व्यवसाय साध्य झाला असून, यावर्षी अधिक व्यवसायाची अपेक्षा आहे. यात विक्रेता आणि खरेदीदाराला सेवेच्या मापदंडाचे समाधान करणे व पोर्टल स्पर्धेत उतरणे जरुरी आहे. नोंदणी, विक्रेत्याची क्षमता निर्धारण, कॅटलॉग अपलोड केल्यावर अ‍ॅक्टिव्ह सेलर होऊ शकतो.
फ्री मॉडेल, फ्री रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग कॅलेंडर, फ्री सेशन, पीडीएफ, पीपीटी 16 भाषेत उपलब्ध असून, व्यावसायिकांना सुवर्णसंधी देणार्‍या या पोर्टलचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. त्यांनी याप्रसंगी श्रोत्यांचे शंकासमाधानही केले. प्रास्ताविक वेदच्या अध्यक्ष रिना सिन्हा यांनी केले. स्वागत विनोद सिंग यांनी केले.