उद्धव ठाकरे यांच्या खिशाला अडीच वर्ष पेन नव्हता म्हणुन 50 आमदार त्यांना सोडून गेले – चंद्रशेखर बावनकुळे

0

 

यवतमाळ : महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री पाहिला ज्याच्या खिशाला अडीच वर्षे पेन नव्हता उद्धव ठाकरे असेच मुख्यमंत्री होते बिना पेनाचे आणि त्यामुळेच त्यांना शिवसेनेचे 50 आमदार सोडून गेले. त्यांच्या खिशाला पेन नसल्याने त्यांनी कधी आमदाराच्या पत्रावर सही केली नाही. मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री यांच्या खिशाला मात्र चार- चार पेन आहेत असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. या वेळेस त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बेईमानी केली आणि मुख्यमंत्री पदाची चोरी केली. स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यांचा अडीच वर्षाचा काळ वाया गेला. त्यानंतर मर्द मराठा एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून बाहेर निघाले. खोके, ओके हा विषय कुठे आहे ? ते खोटे सांगतात खोक्याने कधी आमदार निवडून येतात का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात नागपूरचे अधिवेशन बंद करून टाकले.वैधानिक विकास महामंडळ बंद करून टाकले. आता राष्ट्रवादीने काल परवा गद्दार दिवस साजरा केला.मात्र, 10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली तर राष्ट्रवादीचा गद्दार दिवस कोणता असा सवालही त्यांनी या वेळेस केला.विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्रमध्ये काँग्रेसकडे तीन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. त्यामध्ये नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडे सुप्रिया सुळे ,अजित पवार आणि जयंत पाटील यांचे नाव आहे तर शिल्लक सेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावे आहेत आता वज्रमूठ लंबी झाली असेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे हे महाभारतातील धृतराष्ट् प्रमाणे पुत्र प्रेमात होते असाही हल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला