विजेअभावी ग्रामीण भागात या कामांना फटका

0

चंद्रपूर(Chandrapur) १ जुलै :- चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनियमित विद्युत पुरवठा सुरळीत करत शेतकरी व ग्रामिण जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे(Brijbhushan Pazare) यांनी केली.

या मागणी संदर्भात ब्रिजभूषण पाझारे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची एका शिष्टमंडळासह भेट घेत चर्चा केली. अधीक्षक अभियंता संध्या चिवन्डे, उपकार्यकारी अभियंता पेंदोर यांच्याशी पाझारे यांनी संवाद साधला.

या चर्चेदरम्यान ब्रिजभूषण पाझारे म्हणाले,चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अनियमित विद्युत पुरवठा होत असल्यामुळे ग्रामीण जनता, शेतकरी आदी सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. सतत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठयामुळे शेतीच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दुपारी, रात्री कधीही विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे शेतकरी त्रास्त झाले आहे. कृषी पंपाशी संबंधित कामे यामुळे प्रभावित होत आहे. आटा चक्की, कांडप मशीन व संबंधित व्यवसायाला त्याचा फटका बसत आहे.

सध्या शालेय, महाविद्यालयीन प्रवेशाचे दिवस आहेत. त्यामुळे उत्पन्न दाखले व संबंधित कागदपत्रे ऑनलाईन काढण्यासाठी सुद्धा अनियमित विद्युत पुरवठया मुळे प्रभावित होत आहेत. यामुळे ग्रामीण जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वायरमन, लाईनमन यांचे असहकार्य या समस्येत भर घालत आहे. महावितरण चे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, असेही ते म्हणाले.

या समस्येचा गांभीर्याने विचार करून त्वरित नियमित विद्युत पुरवठा करत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी ब्रिजभूषण पाझारे यांनी केली.

महावितरण कार्यालय घुग्गुस येथे 24 तास वायरमन उपलब्ध करून देण्यात यावा, ग्रामीण भागात शेतीपंपाचा विद्युत पुरवठा कधीही कधीही खंडित होतो तो तात्काळ सुरू करावा या मागण्या त्यांनी केल्या. या बाबत त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले.
ब्रिजभूषण पाझारे यांच्या सह शिष्ट मंडळात सरपंच विजय आग्रे, ग्रामपंचायत सदस्य सुनील इगपवार गजानन पानघाटे आदींची उपस्थिती होती.