नाराजीपायी इंडिया आघाडीची बैठकच पुढे ढकलली!

0

नवी दिल्ली: तीन राज्यांत काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर इंडिया आघाडीतील चित्र बदलल्याचे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीस सहभागी होण्यास असमर्थता दर्शविल्यावर ही बैठकच आता पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. निवडणुकीपूर्वीच या बैठकीची तारीख निश्चित झाली होती, हे विशेष. (INDIA Alliance meeting Postponed)
बैठकीपूर्वीच इंडिया आघाडीत नाराजीचा सूर असल्याचे दिसून आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. नितीश कुमार यांच्या जागी जेडीयूचे लल्लन सिंह आणि संजय झा आणि अखिलेश यांच्या जागी सपाकडून राम गोपाल यादव बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. ममता बॅनर्जी यांनी तर आपल्याला या बैठकीचे कल्पनाच नसल्याचे सांगितले होते. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. माझा उत्तर बंगालमध्ये ६ ते ७ दिवसांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मला बैठकीस येता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता खर्गे यांनी ही बैठकच पुढे ढकलली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप व मोदींच्या विरोधात विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून सुरु आहेत. या आघाडीत काँग्रेससह २६ पक्षांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही या आघाडीत एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे.