

सोलापूर(Solapur), 2 जुलै :- दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून नागेश आण्णाराव चिक्काळे (वय ३५, रा. कल्याण नगर भाग-२) यानेच मित्र विनायक कामन्ना हक्के (वय २६, रा. जामगाव, ता. मोहोळ) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघड झाले आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विजापूर नाका पोलिस व शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या नऊ तासांच संशयिताला जेरबंद केले आहे. नवीन न्याय संहितेनुसार दाखल होणारा खुनाचा हा सोलापुरातील पहिला गुन्हा ठरला आहे.
विजापूर नाका पोलिसांना आसरा चौक परिसरातील शारदा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत एका तरूणाचा खून झाल्याची खबर मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली होती. पोलिस आयुक्त एम राज कुमार, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशानुसार विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनीही आपल्या पथकांना आरोपीच्या शोधासंदर्भात सूचना केल्या होत्या.