

इंफाळ:- मणिपूरमध्ये (Manipur) पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. १ सप्टेंबर रोजी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कौत्रुक परिसरात कुकी दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आणि ९ जण जखमी झाले. हल्लेखोरांनी गावात अंदाधुंद गोळीबार केला आणि ड्रोनद्वारे बॉम्ब (Drone attack) टाकून हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावात दहशत पसरली आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. या हल्ल्यानंतर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.
मणिपूर सरकारने या हिंसक हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कुकी अतिरेक्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक ड्रोनद्वारे बॉम्ब टाकला. असा ड्रोन सामान्यतः युद्धात वापरला जातो, आणि याचा वापर करण्यासाठी उच्च प्रशिक्षित आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. त्यामुळे या घटनेत एक मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील हिंसाचार टाळण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.