

नागपूर(Nagpur), 12 जुलै :- शाळा, महाविद्यालयांच्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित रीत्या गंतव्यस्थळी पोहोचवण्याची जबाबदारी स्कूल व्हॅन, ऑटो, स्कूल बसचालकांची असते. पण ड्रायव्हिंग कौशल्य नसणे, मद्यपान करून चालवणे, वेगावर नियंत्रण नसणे जशा अनेक कारणामुळे मुलांचे जीव धोक्यात येतात. या चालकांना वाहतूक नियमांबद्दल जनजागृतीपर प्रशिक्षण देणारा जनआक्रोशचा प्रशिक्षण वर्ग 14 जुलै पासून सुरू होत आहे.
जनआक्रोश या रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेद्वारे दरवर्षी ‘डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चालकांना प्रशिक्षित देण्यात येते. यावर्षीच्या प्रशिक्षण वर्गाला ट्रॅफिक पाक, धरमपेठ येथे प्रारंभ होत असून त्याचे उद्घाटन रविवारी, 14 जुलै रोजी सकाळी 9 वाजता मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. आदर्श विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष अनिल सारडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील, अशी माहिती जनआक्रोशचे प्रशिक्षण संचालक अनिल जोशी व सुबोध देशपांडे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, स्कूलव्हॅन, ऑटो व बस चालकांनी सुरक्षित वाहन चालवल्यास रस्त्यावरील ट्रॅफिकच्या समस्या नियंत्रणात येऊ शकतील, शिवाय, शाळकरी मुलांवर रस्ते नियमांचे पालन करण्याचे संस्कार होतील, असा या प्रशिक्षणामागे दुहेरी उद्देश आहे. चालू शैक्षणिक सत्रात नोव्हेंबर महिन्यापर्यंत विविध शाळांशी संबंधित असलेल्या सुमारे एक हजार ड्रायव्हरला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग मोफत असून प्रत्येक आठवड्यात शनिवार व रविवारी ट्रॅफिक पार्क येथे आयोजित केले जातील.
शैक्षणिक संस्थाचालक त्यांच्याशी संबंधित ऑटो, व्हॅन, बसचालकांना हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जनआक्रोशतर्फे करण्यात आले असून अधिक माहितीकरीता जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर (9422105911) व प्रकल्पाचे समन्वयक ज्ञानेश पाहुणे (9823075443) यांच्याशी संपर्क साधावा.