‘स्वप्ने, सायकोथेरपी आणि मनाच्या गूढ स्थितींचा वेध’: डायनॅमिक सायकीअट्री परिषदेत नव्या विचारांचे मंथन

0

– मानसोपचार आणि चिकित्सक दृष्टिकोन या विषयांवर अभ्यासपूर्ण सत्रांद्वारे परिषदेचा शानदार समारोप

नागपूर (nagpur) | १३ एप्रिल — डायनॅमिक सायकिअट्रीवर आधारित भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला दुसऱ्या दिवशी बहार आली. सायकिअट्रीक सोसायटी नागपूर (PSN) च्या आयोजनात झालेल्या World Association of Dynamic Psychiatry (WADP) – India Chapter च्या या ऐतिहासिक परिषदेच्या समारोपीय दिवशी, विविध सत्रांमधून मानसिक आरोग्यावरील नवे विचार, दिशा आणि उपायांचा अभ्यासपूर्ण पट उलगडला.

दिवसाची सुरुवात झाली डॉ. अमित कुलकर्णी यांच्या “Dreamwork: Working Through the Dynamic Mind” या सत्राने. त्यांनी स्वप्नांचे विश्लेषण, द्विध्रुवीय व्यक्तींच्या स्वप्नातील नमुने, आणि स्वप्नांमधून समजणाऱ्या अंतर्मनाच्या गूढतेवर प्रकाश टाकला. विविध जीवनप्रवाहातील व्यक्तींना पडणाऱ्या स्वप्नांचा मानसशास्त्रीय अर्थ त्यांनी स्पष्ट केला.

यानंतर जर्मनीच्या डॉ. मारिया अम्मोन यांनी “Identity as All Interpersonal Exchange in a Rapidly Changing World” या विषयावर विचारमंथन करत दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ओळखीच्या (identity) संकल्पना, सामाजिक बदल, आणि सहिष्णुता यावर सखोल मांडणी केली.

डॉ. अरुण किशोर यांनी Baliant Groups च्या माध्यमातून भारतात मर्यादित साधनांमध्ये मानसोपचार प्रशिक्षणाचा नवा मार्ग मांडला. त्यांनी Baliant India Foundation अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. राकेश चड्ढा यांनी “Psychotherapy by Psychiatrists: A Model for India” या सत्रातून सिंगल सेशन थेरेपी, औषधांशिवाय मानसोपचार, आणि डॉक्टर-रुग्ण संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यानंतर NIMHANS चे डॉ. जॉन पी. जॉन यांनी Psychodynamic Formulation या विषयावर विस्तृत सत्र घेतले. त्यांनी Freud च्या मनाच्या रचनात्मक संकल्पना, केस फॉर्म्युलेशन, आणि रुग्णाच्या वर्तनातील विशिष्ट पॅटर्न शोधण्याच्या पद्धती विषद केल्या.

त्यानंतर पार पडलेल्या समारोप सत्रात प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. विवेक किर्पेकर, डॉ. राकेश चड्ढा, डॉ. मारिया अम्मोन, डॉ. रॉय अब्राहम कल्लिवायलिल, डॉ. स्नेहिल गुप्ता, डॉ. सुधीर महाजन, डॉ. शशि राय आणि डॉ. हीना मर्चंट होते.

WADP India चे अध्यक्ष डॉ. रॉय कल्लिवायलिल यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच परिषदेचे सह आयोजन अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे, आयोजन सचिव डॉ. सुधीर महाजन आणि ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना WADP ची मानद फेलोशिप जाहीर केली.

तर WADP India चे महासचिव डॉ. स्नेहिल गुप्ता यांनी परिषदेचा संक्षिप्त आढावा घेताना १५ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वक्ते, १८९ प्रतिनिधींची नोंदणी आणि विविध माहितीपूर्ण शैक्षणिक सत्रे यांविषयी माहिती दिली.

परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. विवेक किर्पेकर यांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषविणे गौरवास्पद असल्याचे सांगत आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले. तर आयोजन सचिव डॉ. सुधीर महाजन यांनी हा क्षण आदर आणि समाधानाचा असल्याचे सांगत सर्व सहकाऱ्यांचे आणि सहभागी प्रतिनिधी, सदस्य व संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. समारोप प्रसंगी संयोजक समितीच्या सर्व सदस्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.