

नागपूर (NAGPUR): खो-खो या भारतीय खेळाचे पहिल्यांदाच जागतिक स्तरावर आयोजन होत असून पहिला खो-खो वर्ल्ड कप 2024-25 दिल्ली येथे खेळला जात आहे. यात भारतासह इंग्लंड, जर्मनी, हॉलंड, अमेरिका अशा एकुण 24 देशांमधील पुरूष व महिलांचे संघ सहभागी झाले आहेत. या पहिल्या वर्ल्ड कपचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) होण्याचा मान नागपूरच्या ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथे प्राचार्य डॉ. विजय दातारकर यांना प्राप्त झाला आहे.
खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव एम. एस. त्यागी यांनी 13 ते 19 जानेवारीदरम्यान दिल्ली येथे सुरू असलेल्या या वर्ल्ड कपसाठी डॉ. दातारकर यांना आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) म्हणून नामनिर्देशित केले आहे. डॉ. विजय दातारकर हे नागपूर डिस्ट्रीक्ट खो-खो असोसिएशनचे सदस्य असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध क्रीडा समित्याचे ते सदस्य आहेत. शालेय जीवनापासून खो-खो चे खेळाडू असलेल्या डॉ. दातारकर यांनी 25 ते 30 अखिल भारतीय खो-खो स्पर्धांमध्ये खेळले असून विविध स्पर्धांचे नेतृत्वदेखील केले आहे. त्यांच्या या नियुक्तीसाठी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.