डॉ. श्रीकांत गोडबोले यांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन

0

पंत पडले राव चढले’ म्हणजे नोकरशाहीचे महाभारत: डॉ. वि.स.जोग

नागपूर (Nagpur): नोकरशाहीचे विस्तृत आणि विदारक दर्शन दाखविणारे ‘पंत पडले राव चढले‘ म्हणजे एक प्रकारे नोकरशाहीचे महाभारत असल्याचे कौतुकयुक्त प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक व साहित्यिक डॉ. वि.स.जोग यांनी केले.
ज्‍येष्‍ठ साहित्यिक, प्रेरक वक्‍ते, मार्गदर्शक डॉ. श्रीकांत गोडबोले यांच्‍या ‘पंत पडले राव चढले’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. साहित्य विहार संस्थेतर्फे बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी साहित्य विहार संस्थेच्‍या अध्‍यक्ष आशा पांडे होत्या. मिटकॉनचे उपाध्‍यक्ष राजेश मिश्रा, नागपूर नागरिक सहकारी बँकेचे सहायक महासंचालक श्रीकांत वनकर, रा.तु.म.विद्यापीठाचे सिनेट सदस्‍य दिनेश शेराम, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. वसुधा वैद्य यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

डॉ. वि.स.जोग पुढे म्हणाले की या पुस्तकात नोकरशाहीमुळे झालेल्या जनतेच्या नुकसानीची ‘क्ष किरण चिकित्सा’ आणि पारदर्शक आलेख देण्यात आला आहे. पुस्तकात साहित्यिक भाषेचा उपयोग उत्तम केला आहे. कर्मचाऱ्यांचा कामचुकरपणा सांगणारे – ‘अशी ही ढकला ढकली’, कर्मचाऱ्यांची विभागणी – ‘कष्टाळू, कष्टटाळू आणि कसं टाळू’ असे काही उल्लेख जोग यांनी वाचून दाखविले. हे पुस्तक विद्यापीठाच्या राज्यशास्त्र, समाजशास्त्र, साहित्यशास्त्र विभागात ठेवावे,असे देखील जोग यांनी सुचविले.
डॉ. श्रीकांत गोडबोले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ‘मी लिहिलेले पुस्तक हे नोकरशाहीच्या आरोग्यासाठी आहे. नोकरशाही बाबत सविस्तर ऊहापोह यात करण्यात आला आहे. नोकरशाहीच्या अनेक पैलू यात उलगडले आहे’. भारतीय नोकरशाहीचे पितळ हे कोरोंना मध्ये उघडे पडले असे सांगत ‘कागदी घोडे नाचविणे’ म्हणजे काय ते खऱ्या अर्थाने लोकांना कळले. कर्मचारी काही वर्षाने कसा कोडगा होतो यावर त्यांनी मिश्किल वक्तव्य केले. नोकरशाही आणि समाजातील सेवा घेणारे आणि सेवा देणारे यामध्ये विसंगती झाल्यास काही ठिकाणी विनोद निर्माण झाले असले तरीही पुस्तक गंभीर विषय हाताळते असे गोडबोले म्हणाले.
सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. वसुधा वैद्य यांनी डॉ. गोडबोले यांचे अभिनंदन केले. राजेश मिश्रा, श्रीकांत वनकर, दिनेश शेराम यांनी विचार व्यक्त केले. आशा पांडे यांनी अध्यक्षीय भाषण केले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रगती वाघमारे यांनी जितेंद्र पटवर्धन यांनी सरस्वती स्तवन यांनी केले.

चौकट
नोकरशाहीमध्ये ‘शाही’ शब्द बाधतो- आशा पांडे
नोकरशाही म्हंटल्यावर सर्व कर्मचारी ‘शाही’ असल्यासारखे वागतात. त्यामुळे शाही शब्द बाधक असल्याचे मत साहित्य विहार च्या अध्यक्ष आशा पांडे यांनी व्यक्त केले. ‘शाही’ शब्दाला पर्यायी शब्द द्यावा असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले. याशिवाय हे पुस्तक आपल्या जीवनाचे वास्तव असल्याने आपण आपले अनुभव त्यातून पडताळून पाहतो असे त्या म्हणाल्या. डॉ गोडबोले हे बहूमुखी लेखक असल्याचे सांगून त्यांच्या लेखनाचे कौतुक त्यांनी केले आणि शुभेच्छा दिल्या.