

वायसीसीईचा ‘रुबी जुबिली’ वर्षाला उत्साहात प्रारंभ
यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय मधील संगणक तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘पाऊलखुणा’ या विशेष कार्यक्रमात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी आनंदवनचा परिवर्तनशील प्रवास उलगडला. त्यांनी डॉ. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या कुष्ठरुग्णांवर उपचार आणि पुनर्वसन कार्यात आमटे कुटुंबीयांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची आठवण करून दिली.
वायसीसीई 40 व्या वर्षात पदार्पण करीत असून हे वर्ष ‘रुबी जुबिली’ वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार असून त्या शृंखलेतील ‘पाऊलखुणा’ हा पहिला कार्यक्रम होता. महाविद्यालयाच्या परिसरातील दत्ता मेघे हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंचावर डॉ. मंदाकिनी आमटे, वायसीसीईचे प्राचार्य डॉ. यू. पी. वाघे, तांत्रिक संचालक डॉ. एम. एम. क्षीरसागर, संगणक तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. के. आर. सिंह यांची उपस्थिती होती.
बाबा आमटे यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त व समाजाद्वारे अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजाला आपलेसे करून त्यांच्यावर उपचार केले. याच काळात त्यांनी वरोरा येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली. हेच पुढे आनंदवन समाजाचे हृदयस्थान बनले असे सांगताना डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, माझ्या वडिलांनी या रूग्णांमध्ये निर्मितीची शक्ती निर्माण केली. त्यांना उत्पादक कार्यात गुंतण्यासाठी, घडवण्यास आणि अर्थपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. बाबासाठी सृजनातून मिळणारा आनंद त्यांच्या जीवनाची पुनर्बांधणी करणारा होता.
“आज आमटे कुटुंबाची चौथी पिढी कुष्ठरुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी समर्पित असून ही तरुण पिढी शिक्षित, हुशार आहे. प्रत्येक बाबतीत सतत सुधारणा करण्यावर त्यांचा विश्वास आहे, असे ते पुढे म्हणाले.
यावेळी डॉ. यू.पी. वाघे यांनी डॉ. प्रकाश आमटे यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला, तर डॉ. एम.एम. क्षीरसागर यांनी डॉ. मंदाकिनी आमटे यांचा सत्कार केला.
प्रास्ताविकातून डॉ. यू.पी. वाघे यांनी शैक्षणिक संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 40 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करताना त्यांनी संस्थेच्या सर्व सदस्यांकडून सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. के.आर. सिंग यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अजिंक्य एदलाबादकर, डॉ.प्रार्थना देशकर, प्रा.दिप्ती कश्यप, डॉ.सुप्रिया ठोंबरे, प्रा.निखिल मंगरुळकर, स्मिता आर. कापसे यांचे सहकार्य लाभले.