डॉ. नंदपुरे यांच्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी

0

नागपूर (nagpur), 6 फेब्रुवारी
विदर्भ साहित्य संघ आणि सामाजिक समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ईश्वर नंदपुरे यांच्या चार ग्रंथांचा प्रकाशन सोहळा रविवार, 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात रविवारी होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. ग्रंथाचे प्रकाशन म.रा. विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते होणार असून या पुस्तकांवर सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. मदन कुळकर्णी ‘अडगळ आणि इतर कथा’ यावर, सुप्रसिद्ध कवी व संशोधक डॉ. बळवंत भोयर हे ‘आयुष्य हे- एक दीर्घ काव्य’ यावर, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सपना तिवारी ‘मेरी मंजिल’ या हिंदी काव्य संग्रहावर, तर सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे ‘साहित्य लेणी- एक आकलन’ या लेखसंग्रहावर भाष्य करणार आहेत.

याप्रसंगी देवगिरी प्रांताचे समरसता साहित्य परिषदेचे सरचिटणीस डॉ. प्रसन्न पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.