

प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीला दिली भेट
नागपूर (Nagpur), 13 ऑक्टोबर
भारताच्या अवकाश क्षेत्रातील अत्यंत यशस्वी अशा चांद्रयान मोहिमेचे नेतृत्व केलेले भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांच्या भेटीने प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीतील विद्यार्थी हरखून गेले. त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
प्रसंग होता, प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी, धरमपेठ येथील ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञांच्या गॅलरीचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. के. सिवन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उपस्थित धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीचे अध्यक्ष हेमंत चाफले यांच्या हस्ते डॉ. सिवन यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भविष्यातील शास्त्रज्ञ घडवणा-या प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीचे कौतुक करताना डॉ. सिवन यांनी त्यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा दिला.
‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करा
विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. सिवन म्हणाले, संशोधन क्षेत्रात जर तुम्हाला यायचे असेल तर ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करा. पालक, शिक्षकांचे न ऐकता तुमच्या कल्पनांवर काम करा. कुणालाही फॉलो न करता तुमच्या स्वत:च्या क्षमता ओळखा आणि जे क्षेत्र निवडाल त्यात उत्कृष्ट कार्य करा. स्वत:चे तंत्रज्ञान विकसीत करा आणि इस्त्रोसारख्या सारख्या संस्थामध्ये जाण्यापेक्षा स्वत:चे स्टार्टअप सुरू करा, असा सल्ला त्यांनी दिला.
अपयश हे यशाची पहिली पायरी
एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सिवन म्हणाले, अपयश हे कधीच वाईट नसते. अपयश नव्या गोष्टी शिकवण्याची संधी देते. फेल या इंग्रजी शब्दाला अर्थ फर्स्ट अटेम्प्ट टू लर्निंग असा असून हे अपयश यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे अपयशाला घाबरू नका, असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीच्या संचालक डॉ. सीमा उबाळे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला धरमपेठ शिक्षण संस्थेचे माननीय पदाधिकारी,एक्सप्लोरेटरीचे पदाधिकारी,कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.