डॉ आशिष देशमुखांनी घेतले साईबाबांचे आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन

0

 

नागपूर -येत्या रविवारी पुन्हा भाजपत प्रवेशापूर्वी माजी आमदार डॉ. आशिष रनजीत देशमुख यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबा आणि नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यानिमित्ताने प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी राजकीय वाटचालीच्या महत्वपूर्ण वळणावर आहे. महाराष्ट्रातील जनतेची चांगली सेवा करण्याची संधी व ताकद मिळावी म्हणून साईबाबांचे आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. माझं राजकीय आयुष्य आता नवीन वळणावर उभं आहे. भविष्यात जनतेची सेवा करीत रहावं, हीच माझी अपेक्षा आहे. समाजाच्या सेवेचे व्रत घेऊन मी राजकारणात आलो आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी माध्यम हे महत्वाचे आहे. त्या अनुषंगानेच, एका नवीन वाटेवर माझे जाणे आता निश्चित झाले आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून आणि जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने पुढची वाटचाल करणार आहे.
दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि विदर्भातील कॉंग्रेस पक्षामधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाबद्दल बोलणं गरजेचे नाही. माझं राजकीय आयुष्य आता सकारात्मक वळणावर असून ते जनतेच्या सेवेसाठी रहावं, हीच माझी अपेक्षा आहे असेही ते यावेळी म्हणाले.
डॉ. आशिष देशमुख रविवारी भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथील ‘नैवेद्यम नॉर्थस्टार’ सभागृहात 18 जूनला सकाळी 10 वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.