

नवी दिल्ली: जुनी पेन्शन योजना (Old Pension) पुन्हा लागू करण्याची मागणी होत असताना रिझर्व्ह बँकेने राज्यांना इशारा दिला आहे. (Reserve Bank of India) जुनी पेन्शन योजना (OPS) सुरु केल्यास खर्च अनेक पटींनी वाढून त्यामुळे तिजोरीवर भार पडेल व आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याचा धोका असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेने अहवालात जुन्या पेन्शन योजनेच्या आश्वासनांवर चिंता व्यक्त केली आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारांनी दिलेल्या आश्वासनांमुळे आर्थिक बोजा वाढू शकतो व जुनी पेन्शन योजना सरकारी तिजोरीसाठी अत्यंत हानिकारक सिद्ध होईल, अशी भीती बँकेने व्यक्त केली आहे. ‘स्टेट फायनान्स : अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2023-24’ हा अहवाल प्रसिद्ध करत राज्यांना इशारा दिला आहे.
अलीकडेच काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केली आहे. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे. तसेच कर्नाटकातही जुनी पेन्शन योजना (OPS) आणण्याची चर्चा सुरू आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) राज्यांना नवीन पेन्शन योजना (NPS) सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलन सुरु असून मंगळवारी मोर्चा आयोजित करण्यात आलाय.