

नवी दिल्ली-पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरु झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी पराभवाचा राग काढण्यापेक्षा सकारात्मक विचार करावा, नकारात्मक वृत्तीला देशाने नाकारले आहे हे निवडणूक निकालच सांगत आहेत. निवडणुकीतल्या पराभावाचा राग लोकसभेत काढू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) विरोधकांना दिला आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Parliament Winter Session)
पंतप्रधान मोदी म्हणाले, थोडा आपला मार्ग बदलून पाहा. विरोधासाठी विरोध करु नका. ज्या त्रुटी आहेत त्यावर चर्चा करा. हे अधिवेशन म्हणजे तुमच्यासाठी संधी आहे व आता तरी ही संधी घ्या आणि देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो, मौल्यवान असतो, असे ते म्हणाले. तुमच्या वृत्तीमुळे तुमच्याबद्दल देशात तिरस्कार निर्माण झाला आहे तुमच्याबद्दल त्याचे रुपांतर प्रेमात करायचे असेल तर नकारात्मकता सोडा, असेही ते म्हणाले. काही लोक याला सरकार समर्थक सुशासन किंवा पारदर्शकता म्हणतात. हे देशात दिसून येत आहे. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, लोकांच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी लोकशाहीचं मंदिर महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी तयार राहून संसदेत मांडलेल्या विधेयकांवर सखोल चर्चा करावी, असेही ते म्हणाले.