सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे दिवाळी स्नेहमिलन सोहळा उत्साहात

0

चंद्रपूर(Chandrapur) : सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे दिवाळी स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांचे उपस्थितीत सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री. वानखेडे होते. त्यांच्या समवेत सहाय्यक धर्मदाय आयुक्त अधिवक्ता असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. ढोक, उपाध्यक्ष ऍड. टिकले, सचिव ऍड. काकडे, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. मारलीवार, सचिव ऍड. खडतकर तसेच असोसिएशनचे माजी सचिव ऍड. आशिष धर्मपुरीवार हे मंचावर उपस्थित होते.

या स्नेहमिलन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री. वानखेडे यांनी यंदाची दिवाळी ‘स्वदेशी’ बनवण्याचे आवाहन केले. “भारतीय बनावटीच्या उत्पादनांचा वापर करून सण साजरा करावा, यामुळे देशी उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल,” असे ते म्हणाले.

ऍड. टिकले यांनी आपल्या भाषणात दिवाळीच्या पौराणिक आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व विशद केले. ऍड. खडतकर यांनी दिवाळी साजरी करताना गरजू आणि उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याची गरज अधोरेखित केली. ऍड. आशिष धर्मपुरीवार यांनी अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व गरीबांना मदत करून एक सामाजिकदृष्ट्या उत्तरदायी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ऍड. काकडे यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे मन:पूर्वक आभार ऍड. ढोक यांनी मानले.

या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य अधिवक्ता गण, धर्मदाय आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. स्नेहमिलनाचा कार्यक्रम आपुलकीच्या वातावरणात पार पडला आणि उपस्थित सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.