दिवाळीतील रोषणाई ‘शुभ’ आणि ‘सुरक्षित’ हवीच!

0

रंगरंगोटी, साफसफाई आणि रोषणाई करताना विजेचे अपघात टाळा

 

नागपूर दि. 13 ऑक्टोबर 2025: प्रकाशपर्व अर्थात दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले असून, घरोघरी उत्साह, साफसफाई आणि तयारीची लगबग सुरू झाली आहे. या मंगलमय आणि नवचैतन्याच्या वातावरणात दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी समस्त वीज ग्राहकांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या निमित्ताने सर्व वीज ग्राहक, कर्मचारी आणि हितचिंतकांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छोटीशी चूक पडू शकते महागात!
दिवाळीतील सजावट, रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी यामुळे होणारी छोटीशी चूकही दुर्दैवी घटनांना आमंत्रण देऊ शकते. दरवर्षी फटाक्यांमुळे आग लागण्याच्या अनेक घटनांची नोंद होते, ज्यात दुर्दैवाने वित्तहानीसोबतच जीवितहानी होण्याचीही शक्यता असते. निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे अपघात घडतात. आपल्या आणि कुटुंबाच्या दिवाळीचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी, महावितरणने काही महत्त्वाचे खबरदारीचे उपाय सुचवले आहेत, ज्यांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.

वीजेचा वापर जपून आणि ‘स्मार्ट’ली करा:
दिवाळीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विद्युत रोषणाईमुळे वीज यंत्रणेवर तात्पुरता ताण येतो. त्यामुळे वीजेचा वापर गरजेनुसार आणि जपून करा. बाजारात आता कमी वीज लागणारे एलईडी दिवे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या आधुनिक दिव्यांचा वापर केल्यास वीज वापर नियंत्रित राहील आणि वीज बिलही कमी येईल. रोषणाईसाठी नेहमी उच्च दर्जाच्या मार्क असलेल्या) दिव्यांच्या माळा आणि वायर्सचाच वापर करा.

साफसफाई आणि रंगरंगोटी करताना सुरक्षा नियम:
दिवाळीच्या साफसफाई आणि रंगरंगोटी दरम्यान विजेचे अपघात टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. भिंतींना रंग लावण्यापूर्वी, विशेषतः स्विच बोर्ड आणि सॉकेटजवळ काम करताना, त्या भागाचा मुख्य वीज पुरवठा नक्की बंद करा. रंग लावण्यासाठी वापरली जाणारी शिडी (जिना) कोणत्याही लाईव्ह वायरला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या. तसेच, कोणत्याही विद्युत उपकरणांची साफसफाई करण्यापूर्वी ते बंद करा आणि प्लगमधून काढून टाका स्विच बोर्ड्स आणि सॉकेट्स साफ करताना फक्त कोरड्या कपड्याचा वापर करा. ओला कपडा वापरणे टाळा. साफसफाई करताना सॉकेट्स, स्वीचेस आणि वायर्समध्ये तुटफूट किंवा जळाल्याचे चिन्ह आढळल्यास, त्वरित परवानाधारक इलेक्ट्रिशियनकडून दुरुस्त करून घ्या. उंदरांनी कुरतडलेल्या वायर्समुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो, त्यामुळे अशा वायर्स तात्काळ बदलून घ्या.

रोषणाई आणि फटाक्यांसाठी सुरक्षा सूचना:
रोषणाईचे दिवे पडदे, बिछाना, पंखे किंवा मुख्य वीज तारांपासून लांब आणि सुरक्षित ठिकाणी असतील याची खात्री करा. लहान मुलांना लाईव्ह वायर्स आणि उपकरणांपासून दूर ठेवा. एकाच विद्युत सॉकेटवर अनेक दिव्यांच्या माळा किंवा उपकरणे जोडून अतिरिक्त भार (ओव्हरलोड) टाकणे टाळा. वीज तारांजवळ किंवा विजेच्या उपकरणांजवळ फटाके उडवणे पूर्णपणे टाळा. आतिषबाजी नेहमी मोकळ्या जागेत आणि आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करूनच करा. फटाके उडवल्यानंतर होणारा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका; त्याची योग्य विल्हेवाट लावा.

अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज:
ग्राहकांना या प्रकाशपर्वात दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज वाहिन्या व उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या काळात सार्वजनिक ठिकाणी वीज अपघात होऊ नये यासाठी बाजारपेठ परिसरातील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून उपाययोजना कराव्यात. तसेच, अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व विभागीय, उपविभागीय आणि शाखा अधिकाऱ्यांनी दिवाळी पूर्ण होईपर्यंत स्वतः उपस्थित राहावे आणि या काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या सर्व महत्त्वाच्या नियमांचे पालन करून, आपण आपल्या घरात सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करू शकता. विद्युत सुरक्षेला महत्त्व देऊन, रोषणाईचा खरा आनंद लुटण्याचे आवाहन दिलीप दोडके यांनी केले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर