

*अभ्यंगम् आचरेत् नित्यम्।*
*उठा उठा दिवाळी आली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली।*
*अभ्यंगस्नान म्हटलं की दिवाळी आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे अभ्यंगस्नान*, हे समीकरण आपल्या मनात लहानपणापासून घट्ट बसलेले आहे .पण अभ्यंगस्नान हे काही फक्त दिवाळीच्या पहिल्या दिवशी करायचं नसतं ,तर ते नेहमी, रोज, नित्य करायचं असतं !
तुम्ही म्हणालं इथे रोजची साधी आंघोळ करायला वेळ नसतो ,तर अभ्यंगस्नान रोज कोण करणार ??आणि ते कशासाठी???
तर जाणून घेऊया आजच्या या लेखातून
अभ्यंग* म्हणजे सर्व शरीराला तेलाचे मालिश करून तेल जिरवणे.
साधारण दिवाळीच्या सुमारास हवेमध्ये कोरडेपणा वाढायला लागलेला असतो .सकाळी व रात्री थंड व दुपारी गरम असे वातावरण असते. शरद ऋतूतील उष्म्यामुळे या कोरडेपणात अजून भर पडते. त्वचा कोरडी होते , त्वचेला भेगा पडू लागतात .
म्हणूनच शरद ऋतूच्या मध्यावर ,म्हणजे आश्विन क्रुष्ण चतुर्दशीला सुरू होणाऱ्या , दिवाळी या सणाच्या निमित्ताने *अभ्यंगस्नानाची* प्रथा सुरू करण्यात आली असावी. त्यानिमित्ताने *आता अंगाला तेल लावा* अशी आठवण करून दिली जातेे.
तेलामध्ये *स्निग्धपणा* हा महत्त्वाचा गुण असतो .त्या स्निग्धपणामुळे ,त्वचेत निर्माण होणारा कोरडेपणा नाहीसा होतो.
आपल्या त्वचेत असंख्य छिद्रे आहेत. त्वचा हे आयुर्वेदानुसार *वातदोषाचे* स्थान आहे. त्यामुळे त्वचेवर तेलाचे अभ्यंग केल्यास सर्व शरीरातील वातदोष संतुलित होतो.
आपली त्वचा ही आपल्या आरोग्याचा आरसा असतो. कोणताही शारीरिक किंवा मानसिक व्याधी झाल्यास, त्याचा परिणाम त्वचेवर त्वरित होताना दिसतो. आपण आजारी असलो,मन उदास असले ,तर त्वचा काळवंडते. निरोगी, प्रसन्न आणि आनंदी व्यक्तीची त्वचा तुकतुकीत ,तेजस्वी असते. त्यामुळे त्वचेवर केलेल्या अभ्यंगामुळे शरीर व मन दोन्हीचे आरोग्य सुधारते.
रोज शक्य नसल्यास किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी सर्व शरीराला अभ्यंग करावे . थंडीच्या दिवसात मात्र शक्यतो रोज अभ्यंग करावा
*अभ्यंगमाचरेन्नित्यं,*
*स जराश्रमवातहा*।
*दृष्टिप्रसादपुष्ट्यायु:*
*स्वप्नसुत्वक्त्वदार्ढ्यकृत्*।
नित्य अभ्यंग केल्यामुळे आपण दीर्घकाळपर्यंत तरुण राहतो .शरीराला झालेले श्रम, स्ट्रेस निघून जातो. मन प्रसन्न होते .वात दोषाचे नियंत्रण होते त्यामुळे वातामुळे होणाऱ्या सर्वच आजारांपासून संरक्षण मिळते. नजर- दृष्टी उत्तम राहते . शरीर बांधेसूद राहते. झोप उत्तम लागते .त्वचा तेजस्वी व तुकतुकीत राहते. शरीर बलवान आणि दृढ होते . निरोगी दीर्घायुष्य लाभते.
अरे वा! हे तर एक Total health Package चं आहे की ?
एवढे सगळे फायदे होणार असतील तर अजून काय पाहिजे ?
त्यासाठी रोज शरीराला तेल लावणे ,
*ये कोई बहोत बडी कठीन चीज नहीं है बाबू!*😃
*अभ्यंग विधि* –
रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर ,रिकाम्या पोटी ,स्नानापूर्वी एका वाटीमध्ये तिळाचे तेल,खोबरेल तेल किंवा आपल्या प्रकृति व ऋतुसाठी योग्य असे तेल वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे. अभ्यंग करत असताना त्या खोलीत पंखा, एसी, कुलर इत्यादीचा वापर करू नये.
डोके,चेहरा,मान,गळा, छाती,पोट,हात,पाठ,कंबर पाय या सर्व अवयवांना क्रमाने व्यवस्थित तेल जिरवावे. अशा प्रकारे अभ्यंग करण्यासाठी *आठ ते दहा* चमचे तेलाची आवश्यकता असते आणि *बारा ते पंधरा* मिनिटांचा वेळ लागतो.
एखादा दुर्धर रोग झाल्यानंतर, पंचकर्म केंद्रात जाऊन कैक लिटर तेलाच्या ट्रीटमेंट घेण्यापेक्षा ,हे रोज सात-आठ चमचे तेल वापरणे काय वाईट??
अभ्यंग केल्यानंतर लगेच स्नान न करता ,थोडा वेळ आपली अन्य कामे करून अर्ध्या ते पाऊण तासाने स्नान करावे .
स्नान करताना कोमट पाण्याचा वापर करावा. *साबण अजिबात वापरू नये साबणाऐवजी चंदन, वाळा, नागरमोथा, संत्रासाल, शिकेकाई, आवळा चूर्ण अशा प्रकारच्या सुयोग्य वनस्पतींनी बनविलेले उटणे* वापरावे.
यालाच आयुर्वेदाच्या भाषेत *उद्वर्तन* असे म्हणतात. उद्वर्तन म्हणजे औषधी उटण्याने शरीर रगडणे.उद्वर्तनामुळे अभ्यंगामुळे शरीरात निर्माण झालेल्या चिकटपणा, ओशटपणा निघून जातो, परंतु साबणामुळे होणारे दुष्परिणाम मात्र जाणवत नाहीत.
ज्यांना नेहमीच अभ्यंग करणे खरचं शक्य नाही अशा लोकांसाठी एक छोटीशी युक्ती सुद्धा आयुर्वेदाने सांगून ठेवलेलीे आहे .
शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत्।
जे सर्व शरीराला अभ्यंग करू शकत नाहीत, त्यांनी किमान *डोके, पायाचे तळवे आणि कान* यामध्ये नित्य तेल घालावे.
डोके आणि पायाचे तळवे म्हणजे शरीराची दोन मुख्य प्रवेशद्वारे ,या दोन्ही ठिकाणी जर सातत्याने तेल घालून पहारा ठेवला ,तर दारावरच शत्रूला रोखता येते आणि पुढे वातदोष बिघडून होणाऱ्या दुर्धर आजारापासून शरीराचे संरक्षण होते . कान हे ही असेच दोन द्वारपाल तेही वाताचे स्थान म्हणून कानात तेल घालणे तेवढेच
महत्वाचे !
वात-पित्त -कफ या त्रिदोषांचा लीडर वातदोष! जर तो शांत झाला, तर मग बाकी दोन्ही आपोआपच काबूमध्ये राहतात . म्हणूनच संपूर्ण त्वचा व डोके ,तळवे व कान या तिन्ही चौक्यांवर नियमितपणे तेल घालत राहणे आरोग्यरक्षणासाठी आवश्यक ठरते!
आपण मशीनमध्ये नियमित तेल घातले ,तर तेही न कुरकुरता अनेक वर्षे,उत्तम चालते, मग हे तर आपले अनमोल शरीर आहे !
डोक्यावर तेल घालणे म्हणजे *शिरोभ्यंग*. पूर्वीच्या काळी आंघोळीनंतर रोज डोक्यावर खोबरेल तेल लावण्याची पद्धत होती. आता मात्र ,
*उडती केस भुरुभुरु* ही फॅशन आल्यापासून, केसांचा आणि तेलाचा संबंध तुटला.
पूर्वीच्या काळी नियमितपणे तेल ,शिकेकाई वापरणाऱ्या आपल्या आया-आज्या यांचे केस उत्तम होते,की आता शाम्पू -कंडिशनरच्या जमान्यातल्या मुलींचे ?? हा निरीक्षण करण्यासारखा मुद्दा आहे.
रात्री झोपताना किंवा सकाळी अंघोळीनंतर जर डोक्यावरती तेलाचा अभ्यंग केला तर त्यामुळे *झोप शांत लागते, केसांचा सर्व तक्रारी दूर होतात व दृष्टीही उत्तम राहते*
पादाभ्यंग
पायाच्या तळव्याला तेल चोळणे म्हणजे पादाभ्यंग. पादाभ्यंग नेहमी रात्री झोपतानाच करावा. पूर्वी प्रत्येक घरामध्ये *खोबरेल तेलाची बाटली आणि काशाची वाटी* ही जोडी असेच आणि रात्री झोपताना पायाच्या तळव्याला तेल लावण्याची पद्धत होती.
आज आपण थायलंडला गेल्यावर भरपूर पैसे मोजून , मोठया कौतुकाने foot massage करून घेतो, परंतु आपल्या घरातील तेलाची बाटली आणि काशाची वाटी मात्र दुर्दैवाने लुप्त झालेली आहे.
पायाच्या तळव्याला अभ्यंग केल्यामुळे संपूर्ण शरीरातील उष्णता व कोरडेपणा नाहिसा होतो ,झोप उत्तम लागते, दृष्टी सुधारते.
अनियमित जेवणाच्या वेळा, जागरणे, धावपळ, चिंता अशा प्रकारच्या सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये रोज पादाभ्यंग केल्याने, अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांपासून बचाव होतो , आपली कार्यक्षमता वाढते.
कर्णपूरण
“अरे अरे माकडा कान कर वाकडा” असं म्हणून कानात तेल घालणारी आजी आता घराघरातुन नाहीशी झालेली आहे .हे तेल घालण्यासाठी प्रत्येक घरामध्ये चांदीची किंवा स्टिलची झारी असायची. रोज नाही तरी, निदान आठवड्यातून एक वेळा तरी कानामध्ये तेल घालणे अत्यावश्यक आहे. सध्याचा शहरांमध्ये असणारा गोंगाट ,आवाज, सतत कानावर पडणारे चित्रविचित्र आवाज यामुळे बहिरेपणा, चिडचिड होणे ,मानसिक अस्वास्थ्य या गोष्टींचे प्रमाण खूप वाढलेले आहे .
नित्य कर्णपूरण केल्यामुळे कानामधील कानाची कार्यक्षमता सुधारते .
तिळाचे तेल किंवा वैद्याने सुचवलेले, आपल्याला योग्य असलेले तेल किंचित कोमट करून ,कान वाकडा करून आतील छिद्र भरेपर्यंत कानात घालावे आणि पाच ते दहा मिनिटानंतर कान उपडा करून सर्व तेल काढून टाकावे .अशाप्रकारे सकाळी आंघोळीपूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कर्णपूरण करावे .*फक्त कानामध्ये पू किंवा कोणताही स्राव येत असेल ,कान दुखत असेल तर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कानांमध्ये काहीही घालू नये*.
थोडक्यात काय
*दिवाळी ते होळी रोज*
व *उन्हाळा ते पावसाळा निदान संडे टू संडे तरी अभ्यंग करावा*.
तेही जमणार नसेल तेव्हा निदान *डोके,पाय व कानात तरी तेल घालावे*
*नित्य अभ्यंग करणे हा खरा खुरा आयुर्वेदिक health insurance आहे!*
मग काय, करणार ना स्वतःचे आरोग्य Ensure ?
तेव्हा नक्की करूया, या दिवाळीपासून अभ्यंगाला सुरवात !
26 ऑक्टोबर 2024
*वैद्य उर्मिला पिटकर*
एम.डी. पी एच डी (आयुर्वेद)
आयुर्वेद व्यासपीठ ,
केंद्रीय सहकार्यवाह.
982033954