
मुंबई: क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे प्रलंबित होते. जाहीर झालेले पुरस्कार यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी देण्याचा शासनाचा विचार आहे. पुढील वर्षापासून पुरस्कारांचे प्रस्ताव जानेवारी महिन्यात अंतिम करून शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी पुरस्कार देण्यात येतील, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विधान परिषदेत सांगितले.Distribution of Chhatrapati Awards in February itself!
सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. क्रीडा मंत्री बनसोडे म्हणाले, कोणत्याही पात्र खेळाडूवर अन्याय होऊ नये तसेच पात्र खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये, याकरीता शासनाने प्रस्तावित पुरस्कार यादीबाबत हरकती व सूचना करण्यासाठी तरतूद केली आहे. तथापि यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विविध मान्यताप्राप्त खेळाडूंच्या संघटना तसेच विधिमंडळाचे संबंधित सदस्य यांची एक बैठक आयोजित करण्यात येईल. थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करून पात्र खेळाडूंना नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. योगासनाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये करण्याबाबत तपासून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित तांबे यांनी सहभाग घेतला.