

पात्र दिव्यांग खेळाडूंनी अर्ज भरण्याचे महापालिकेतर्फे आवाहन
(NAGPUR)नागपूर, ता. १६ : नागपूर महापालिकेतर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य दाखविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना विविध स्तरावर आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विशेष घटकातील दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य आयात किंवा खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे महापालिकेच्या समाज विकास विभागाने कळविले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात समाज विकास विभागातर्फे विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे.
नागपूर शहरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणार्या नागपुरातील दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण, खेळासाठी आवश्यक क्रीडा साहित्य, स्पर्धांसाठी येण्या-जाण्याचा खर्चाची तरतूद करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून महापालिकेने अर्ज मागविले आहे. मनपाच्या संकेत स्थळावर www.nmcnagpur.gov.in ऑनलाईन पद्धतीने दिव्यांग लाभार्थी या योजनेंतर्गत अर्ज करू शकतात.
नागपूर महानगरपालिका हद्दीतील ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेच्या विविध टप्यावर मिळावा, या हेतूने सुधारित योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
दिव्यांग खेळाडूंना आर्थिक सहाय्य ऑलम्पिक गेम्स राष्ट्रकुल युवा स्पर्धा, शालेय आशियाई, जागतिक स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, आशियन गेम्स एशियन चॅम्पियनशिप पॅरा ऑलम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक मदत केली जाणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी. १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी पात्र होणाऱ्या खेळाडूंना प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इत्यादीसाठी १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य.दिले जाणार आहे. हे अर्थसहाय्य क्रीडा प्रकार (वैयक्तिक/सांघीक) व स्पर्धा आयोजनाचे ठिकाण यावर अवलंबून राहील, असे महापालिकेच्या समाज विकास विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑलम्पिक स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चँम्पियनशिप, युथ ऑलम्पिक, ज्युनिअर विश्व अजिंक्य पद स्पर्धा, शालेय आशियाई / जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, एशियन स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना ३ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना देश-विदेशातील प्रशिक्षण, मार्गदर्शन व क्रीडा साहित्य आयात करणे वा खरेदी करण्याकरिता. 3 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल, असे महापालिकेच्या उपायुक्त ़डॉ. रंजना लाडे यांनी कळविले आहे.
दिव्यांगांना दरमहा निर्वाह भत्ता
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे दरमहा ५०० रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. मतिमंद, सेरेबल पाल्सी, ऑटीझम, विशेष विकलांग, बहुविकलांग प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना हे सहाय्य केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावरून दिव्यांगांना अर्जकरता येणार आहे. या योजनेचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.