digital physiology : २४४ कोटींच्या खर्चातून ‘हा’ होणार लाभ

0
२४४ कोटींच्या खर्चातून 'हा' होणार लाभ
२४४ कोटींच्या खर्चातून 'हा' होणार लाभ

२१ वैद्यकीय महाविद्यालयांत ‘डिजिटल फिजियोलॉजी प्रयोगशाळा’

नागपूर(Nagpur):- राज्यातील २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील फिजीओलाॅजी विभागात ‘प्रगत डिजिटल फिजियोलाॅजी प्रयोगशाळा’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २४४ कोटींच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एनएमसी) पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनेत प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील फिजियोलाॅजी विभागात प्रगत डिजिटल फिजियोलाॅजी (digital physiology) प्रयोगशाळा बंधनकारक करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना रुग्णांचे डिजिटल यंत्राने टिपलेले वेगवेगळे शारीरिक बदल दाखवून मानवी शरीराबाबतची संपूर्ण माहिती दिली जाते.

ही प्रयोगशाळा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक भाग आहे. तरीही राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अशी प्रयोगशाळा नव्हती. एनएमसीने या त्रुटीवर बोट ठेवले होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याने शासनाला याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार राज्यातील २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येकी एक अशा पद्धतीने एकूण २१ या प्रयोगशाळा ‘टर्न की’ (turn key) पद्धतीने उभारण्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २४४ कोटी १५ लाख ११ हजार ४५० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

बुलढाणा, गडचिरोली, सिंधुदूर्ग, जालना, मिरज, नंदूरबार, रत्नागिरी, परभणी, सातारा, जळगाव, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळयातील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातुरचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळचे श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अंबेजोगाई), पुणेचे बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सोलापूरचे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा मिळणार आहे.