धर्मरावबाबा पुन्हा नक्षली रडारवर!

0

 

गडचिरोली-राज्य सरकारमधील अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली आहे. (Dharmarao Baba Atram) पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा नक्षल्यांनी पत्र काढून धर्मरावबाबांना धमकी दिली असून तुम्हाला आणि सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल असा उल्लेख केला आहे. कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पानी पत्रक काढून धर्मरावबाबांना धमकी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागडसह नवीन सहा खाणींना पाठिंबा दिल्यामुळे आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस दल सतर्क झाले असून आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्यांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत बोलताना गडचिरोली परीक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, आत्राम यांना सध्या झेड सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा कुठलाही प्रश्न नाही. नक्षलवाद्यांच्या धमक्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. गडचिरोली जिल्ह्यात जी विकासकामे होत त्यांना नक्षलवाद्यांचा विरोध आहे. बंदूकीच्या जोरावर लोकांना एकत्र करुन आंदोलन केले जात आहे. नक्षलवाद्यांचा तळ असलेल्या तोडगट्टा गावात गावकऱ्यांना हाताशी धरून आंदोलन केले जात आहे. गावापर्यंत पोलीस येऊ नयेत म्हणून नक्षलवाद्यांना गावचा विकास करायचा नाही, असेही ते म्हणाले. आत्राम यांना राज्य सरकारची झेड सुरक्षा व्यवस्था आहे.