

खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ चौथा दिवस
नागपूर (Nagpur) :- ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल..’ असे म्हणत ‘जय जय राम कृष्ण हरी’ च्या गजरात आज हजारो भक्तांनी टाळकरी, वारकरी मंडळांच्या सोबत हरिपाठात उत्स्फूर्त सहभाग घेतला. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या परिसरात आज सकाळच्या सत्रात हरीपाठ पठणाचे आयोजन करण्यात आले. लहान मोठे सर्वजण पारंपरिक वेशभूषा, तुळशी वृंदावन, टाळ यांच्यासह टाळकरी, वारकरी मंडळांच्या मार्गदर्शनात ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या नामत रंगून गेल्याचे विहंगम दृश्य याठिकाणी पाहायला मिळाले.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन गडकरी, आळंदीचे ह.भ.प राम महाराज जिंतूरकर, नागपूरचे ह.भ.प प्रमोद महाराज ठाकरे, ह.भ.प संदीप महाराज कोहळे आणि कोलबा स्वामी देवस्थानचे ह.भ.प विकास भिशीकर महाराज, विश्वनाथ कुंभलकर यांनी दीपप्रज्वलन केले आणि विठ्ठलाची पूजा करून कार्यक्रमाची विधिवत सुरवात केली. यावेळी किरण रोकडे, महिला अध्यक्ष, पतंजली पीठाच्या योगासन शिक्षिका उर्मिला जुवारकर, पतंजलि नागपूरच्या माधुरी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हरीपाठात हजारो भक्त, टाळकरी, वारकरी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
जय जय राम कृष्ण हरी, गजर हरिनामाचा, विठू माझा लाडका, ज्ञानबा तुकाराम .. अश्या विविध भजनांवर वारकऱ्यांसह उपस्थित लहान मोठ्या सर्वांनी ताल धरला. यावेळी टाळकरी, वारी मधल्या हरिनाम भजनांवर कश्या प्रकारे चालले जाते, कुठले खेळ खेळले जातात याची प्रात्यक्षिके करून सर्वांना सहभागी करून घेत होते. काही महिलांनी यावेळी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली होती. याशिवाय वारीची खरी गंमत अत्यंत उत्साहाने अनुभवता यावी म्हणून योगाभ्यास घेण्यात आला. शरीर आणि मन शुद्ध करणाऱ्या योग – हरिनाम यांचा संयुक्त अनुभव उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.