
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी आता चंद्रभागा नदीत पोहचले आहे. कालपर्यंत नदीमध्ये पाणी नव्हते, रात्री पाणी चंद्रभागेत आल्यानंतर आज सकाळपासून पंढरीमध्ये दाखल झालेले वारकरी नौका विहाराचा आनंद घेत आहेत.
पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी यात्रा जवळ आलेली आहे. लाखो भाविक यात्रेसाठी पंढरीमध्ये दाखल झाले आहेत. चंद्रभागेमध्ये स्नान करून, नौका विहाराचा आनंदही वारकरी आणि भाविक घेताना चित्र पाहायला मिळत आहे.
वासुदेव चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल
पंढरपूर : परंपरागत चालत आलेली वासुदेवाची गाणी आता लुप्त होत चालली आहेत, परंतु परंपरागत सुरू असलेला हा व्यवसाय जोपासणारे वासुदेव आषाढी यात्रेनिमित्त पंढरीच्या चंद्रभागेत दाखल झाले आहेत.
पूर्वीच्या काळामध्ये वासुदेवाचा उदरनिर्वाह हा या व्यवसायातून होत होता, परंतु जसजसं आधुनिक युग सुरू झालं तसतसं वासुदेवाची गाणी कमी कानावर पडू लागली, आणि वासुदेवाचा हा व्यवसाय करणारे व्यवसायिकही कमी होत गेले. आषाढी यात्रा जवळ आल्याने वासुदेव चंद्रभागेच्या पात्रामध्ये दान पावलं दान पावलं म्हणत विठ्ठलनामचा जप करतानाचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
वारकऱ्यांची पहिली ट्रेन रवाना खा.नवनीत राणासह भाजप, ठाकरे गटाने केले वारकऱ्यांचे स्वागत
अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यातून लाखो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात, आज अमरावती रेल्वे स्टेशन येथून अमरावती ते पंढरपूर स्पेशल रेल्वे भाविकांसाठी सोडण्यात आली. यावेळी अमरावती रेल्वे स्टेशनवर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यासह भाजपा ,ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खा. नवनीत राणा व भाजपच्या वतीने वारकऱ्यांना उसळ, पाण्याची बॉटलचे वाटप करण्यात आले .यावेळी खासदार नवनीत राणा वारकऱ्यांसोबत भजनात तल्लीन होऊन हरिनामाच्या गजरात फुगडी खेळण्याचा आनंद त्यांनी घेतला. या स्पेशल ट्रेनला खासदार नवनीत राणा यांनी हिरवी झेंडी दाखवली.