

मुंबई, (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होऊ शकतात. तसे झाले तर महाराष्ट्राचे नेतृत्व कोणाकडे जाणार याविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे.
विद्यमान भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होण्याची पूर्ण शक्यता दिसून येत आहे. यासंदर्भात दिल्लीमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांमध्ये फडणवीस यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकी झाल्या असून, त्याला पूर्णपणे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती. या बैठकांमुळे आता या चर्चांना बळ मिळाले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात या पदाबाबत दिल्लीतून हालचाली घडून येत असल्याचे म्हटले जाते.
देवेंद्र फडणवीस मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रात पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली आहे. इतकेच नव्हे तर, महाआघाडीच्या सरकार दरम्यान ते विरोधी पक्ष नेते म्हणून देखील प्रभावीपणे कार्य करीत राहिले. मागील अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. राज्यामध्ये भाजपला मोठी ताकद निर्माण करून देण्यात फडणवीस यांचे मोठे योगदान राहिले आहे. इतकेच नव्हे तर इतर राज्यातही प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी भाजपला मोठे यश प्राप्त करून दिले आहे.
फडणवीस राष्ट्रीय राजकारणात गेले तर?
दरम्यान, देवेंद्र फडणवीस जर राष्ट्रीय राजकारणात गेले, तर त्यांच्या जागी महाराष्ट्रात नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार, याची देखील चर्चा भाजपा वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेतील यादीमध्ये पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. यात त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच जबाबदारी येणार की उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणात जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या अनुपस्थितीत भाजपचे नेतृत्व कोणाकडे जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.