राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही- देवेंद्र फडणवीस

0

Devendra Fadnavis On Pakistani Citizens: भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Devendra Fadnavis On Pakistani Citizens: भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज (27 एप्रिल) शेवटचा दिवस आहे. मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरून पाकिस्तानी रवाना होत आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिलपर्यंतच वैध असतील. व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठी व्हिसा असलेल्यांनी आज भारत सोडावा, असे परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश आहेत. तर कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही.

राज्यातल्या 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, अशी माहिती समोर आली होती. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही- देवेंद्र फडणवीस

मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर तपास यंत्रणेकडून एनआयएला सहकार्य

काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 400 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. केंद्राच्या आदेशानंतर एनआयएनं दाखल केलेल्या एफआयआरवर चौकशी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर तपास यंत्रणा एनआयएला सहकार्य करत आहे.

मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांचाही भारताला उघडपणे पाठिंबा-

पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली जात असून भारताला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिलाय. तर मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांनीही भारताला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद बिन नाह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला आणि पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.