

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम २०१२ च्या शेवटी पासून वाजू लागले होते. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गोव्यात होती आणि त्यातच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी भाजप तर्फे पंतप्रधानपदाची निवडणूक लढवतील अशी घोषणा करण्यात आली. त्यांच्या दोनच दिवसांनी मी कॉलेजच्या दिवसांत मैत्री घट्ट झालेल्या श्री उदय डबले (वकील, नागपूर) च्या घरी गेले होते. इकडतिकडच्या गप्पा झाल्या आणि मी अचानक त्याला विचारलं, आपल्या देवेंद्रचं काय?
त्यावेळी ते विरोधी पक्षाचे आमदार म्हणून विधानसभा गाजवत होते. आणि त्यांनी आगामी काळात मुख्यमंत्री व्हावं अशी मनापासून इच्छा होती. ती मी उदयसमोर व्यक्त केली. उदयचा चेहरा खुलला, चेहऱ्यावर एक गूढ मिश्कील हसू उमललं, चष्म्या आडचे त्याचे डोळे देखील लकाकले आणि ते उत्तरला. ‘बेशक !!! केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची घोषणा असणार आहे. हेच उद्दिष्ट आहे आणि हेच ध्येय आहे.’
कॉलेजच्या राजकारणात त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांना आणि नंतर त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटणं स्वाभाविकच आहे. सोबतच लहानपणापासून ज्यांनी देवेंद्र फडणवीस या माणसाची जडणघडण होताना पाहिली त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हीच सुप्त इच्छा मूळ धरून होती. कारण या राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांना आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न या सगळ्यांनी जवळून पाहिला आहे. हा माणूस पाताळयंत्री कारस्थानं करून आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी राजकारणात आला नसून त्याला खरोखरच या राज्याबद्दल, या देशाबद्दल उत्कट प्रेम आहे, प्रखर भक्ती आहे आणि इथल्या लोकांच्या भल्याची चिंता आहे याची मनोमन खात्री त्यांना वाटत होती.
राजकीय नेता म्हणून आजवरची त्यांची कारकीर्द बघता दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. त्यातली पहिली गोष्ट – देवेंद्र फडणवीस यांनी समर्थ रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र चांगलंच अभ्यासलं आहे. आणि त्यानुरूप स्वत:ला घडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. माझा तर कयास असा आहे की त्यांच्या राजकारणाच्या चाली या पत्राच्या आधारेच आखलेल्या आहेत. त्यांचा मेंदू अखंड तल्लख असतो, चित्त सावध असतं आणि सदसद्विवेकबुद्धी जागृत असते. ( अखंड सावधान असावें | दुश्चित कदापि नसावें | तजवीज करीत बसावें | एकांत स्थळी|| ). यासाठी एक उदाहरणच पुरेसं आहे – ऐन कोविडच्या काळात १७ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११.३० ला ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला ही लढवैय्या व्यक्ती थेट बांद्रा कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात पोहचते आणि त्यांचा मनसुख हिरेन होण्यापासून वाचवते.
महाराष्ट्र विकास आघाडी नावाच्या कडबोळ्याच्या अडीच वर्षांच्या अंदाधुंद राजवटीत विरोधी पक्ष नेता म्हणून वावरताना त्यांनी राज्यकर्त्यांची दाणादाण उडवत त्यांना सळो की पळो करून सोडलं. त्यानंतर शिजलेल्या राजकारणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा जर आज आढावा घेतला तर आपल्याला सहजच आकळतं की शिवसेनेतील समविचारी लोक जोडून घेण्यात आले. तसंच ज्या ‘काकां’नी आपली सगळी अक्कलहुशारी पणाला लावून ‘देवेंद्र नकोच’ ही मोहीम राबवली, त्यांच्या सगळ्या कटकारस्थानांच्या मुळावरच घाव घातला. त्यांच्या पक्षातही बंडाळी होऊन चिन्हासह पक्ष हातून कसा अलगद निसटतो ते त्यांना सप्रमाण सिद्धच करून दाखवलं. अगदी शिवकालीन भाषेत बोलायचं तर दगाफटका करणाऱ्या दोन गानिमांची खांडोळीच केली. (सकल लोक एक करावें | गलीम निवटोनि काढावें | येणें करिता कीर्ति धावें | दिगंतरी ||१०||)
उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताना आणि ते दायित्व निभावताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधी मावळलं नाही. दिलेला शब्द कसा पाळला जाते आणि सार्वजनिक हितापुढे स्वत:चा स्वार्थ कसा विसरायचा असते याचा वस्तुपाठच त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला. त्यांच्या या शांत आणि संयमी वागण्याला याच पत्रातील पुढील ओवीचं अस्तर आहे याचा अंदाज सहज बांधता येतो. विशेषत: उपमुख्यमंत्री म्हणून पेललेल्या जबाबदारीचा पाया हीच ओवी आहे – समय प्रसंग ओळखावा | राग निपटूनि काढावा | आला तरी कळों न द्यावा | जगा माजी ||२२||
हे सगळं करण्यामागे एकच ध्येय होतं, एकच उद्देश होता आणि एकच लक्ष्य होतं – ‘आहें तितुकें जतन करावें | पुढे आधीक मेळवावें | महाराष्ट्र राज्य करावें | जिकडे तिकडे ||१५||’
दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या साडेसात वर्षांत त्यांनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं की हा माणूस कामाला वाघ आहे. निर्णय घेण्याची आणि राबवून दाखवण्याची प्रचंड क्षमता त्याच्यात आहे. त्यांच्या डोक्यात सतत महाराष्ट्र राज्य, त्यात राहणाऱ्या नागरिकांचा विकास कसा होईल हा एकच विचार असतो. तो त्यांच्या कृतीतून दिसत असतो. महाराष्ट्राच्या भूमीत भू – गर्भातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून राबवलेली जलयुक्त शिवार योजना असो की पूर्व – मध्य – पश्चिम महाराष्ट्र जोडणारा समृद्धी महामार्ग आणि असेच इतर रस्ते असो, की मुंबई मेट्रो!
एकनाथ शिंद्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द म्हणजे सेहवागला शतक पूर्ण करू देण्यासाठी सचिन तेंडूलकरनं त्याला स्ट्राईक देण्यासारखं होतं. या सगळ्या सव्यापसव्यात (हो! सव्यापसव्यच! हा शब्द केवळ आणि केवळ जानव्यासाठीच वापरण्यात येते आणि महाराष्ट्रात जातीयवाद पेटवण्यासाठी देवेंद्रच्या ब्राह्मणत्वाचा नको इतका दुस्वास करण्यात आला आहे. म्हणून हाच शब्द मुद्दाम इथे वापरते आहे.) एक दिवस ‘देवा’ची काठी फिरली आणि अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांना घेऊन सत्तेत सामील झालेत. यातलं राजकारण जे काही असेल पण यात एक सकारात्मक बदल असा जाणवला की शरद पवारांचा ‘टग्या’ म्हणून परिचित असलेले अजितदादा अचानक अतिशय सुसंस्कृत, सभ्य, भद्र आणि परिपक्व म्हणून प्रस्तुत होऊ लागले आहेत. त्यांची ही प्रसन्न समाधानी मुद्रा ते त्यांच्या काकांच्या सावलीत असताना कधीच दिसली नाही. हा सगळा प्रभाव आपल्या देवेनभाऊंचाच आहे हे वेगळ्यानं सांगायला नको.
जिथे जिथे ज्याची ज्याची गरज असेल तिथे तिथे ते ते योग्य प्रमाणात करण्याचा म्हणजे त्यांच्याच भाषेत ‘करेक्ट कार्यक्रम करण्या’चा शहाणपणा आणि धूर्तपणा त्यांच्या गेल्या साडेसात वर्षांच्या नेतृत्वात स्पष्टपणे दिसून आला. या सगळ्याला गर्भरेशमी वागण्याला असलेली भरजरी किनार म्हणजे अडीअडचणीला ते खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे आहेत हा त्यांच्याविषयी वाटणारा विश्वास. शासन चालवताना आणि राजकारणाच्या खेळी – चाली करताना त्यांचा उद्देश वाईट नसतो याची साक्ष त्याचे विरोधक देखील देतात हे देवेंद्रजींचं यश आहे. त्यांचा भारतीय संस्कृतीचा अभ्यासही दांडगा आहे. धर्म – अधर्म आणि आपद्धर्म त्याला नेमका कळतो. त्यामुळे श्रेयस काय याची त्यांची समज पक्की आहे. स्थल – काल आणि परिस्थितीनुसार योजना करताना त्यांच्या मनात राष्ट्रधर्म जागृत असतो.
त्यांच्या राजकारणाचा गाभा सनातन धर्माची व्याख्या करणारं हे सुभाषित आहे – सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् । प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥ सत्य बोलावे, प्रिय बोलावे, अप्रिय असलेले सत्य बोलू नये. प्रिय (वाटणारे) असत्य कदापिही बोलू नये हाच सनातन धर्म आहे.
अभिजात संस्कृत साहित्यात कविकुलगुरु म्हणून ज्यांची ख्याती आहे असे कालिदास वैदर्भीरीती नावाच्या अत्यंत परिष्कृत, लालित्यपूर्ण, मृदू शब्दयोजनाच्या विदग्ध अशा शैलीत अभिव्यक्त झालेत. तीच वैदर्भीरीती देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या पर्यायानं या राष्ट्राच्या राजकारणात रुजवली आहे, तीही ‘बारामती रीती’ रिती करून, याचा आम्हां सगळ्या वैदर्भीयांना अभिमान आहे.