

‘मनी बी’ च्या ‘अमृतकाल : विकसीत भारत – 2047’ परिषदेचे उद्घाटन
नागपूर : आयकराची मर्यादा 12 लाख पर्यंत वाढवण्याचा अतिशय धाडसी निर्णय केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून घेतला असून देशाच्या अर्थसंकल्पांच्या इतिहासातले क्रांतिकारी पाऊल आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना व्यक्त केले.
आर्थिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणा-या मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने ‘अमृतकाल : विकसीत भारत – 2047’ या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सायंटिफिक सोसायटी लॉन, लक्ष्मीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला केडिया सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक स्टॉक मार्केट गुरू विजय केडिया, एनएसईचे चिफ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीराम कृष्णन, मनी बीच्या संचालक शिवानी दाणी व मॅनेजिंग डायरेक्टर आशुतोष वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयकर मर्यादा वाढवण्याच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहे. यामुळे वस्तू, सेवांची खरेदी होईल, मागणी वाढेल, त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि यातून सपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. अमृतकाळात सामान्य माणसाला तसेच राज्याला विकासाच्या भरपूर संधी असून या ‘अमृत बजेट’ चा महाराष्ट्रातील लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
अलिकडच्या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत असून आहेत. जनजागृती व प्रशिक्षणाच्या अभावामुळे अनेकांना जीवनभर कमावलेले पैसे गमावावे लागले आहे. अशावेळी मनी बी आर्थिक प्रशिक्षण व जनजागृती करण्याचे महत्वाचे काम करीत आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आशुतोष वखरे व शिवानी दाणी वखरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
विजय केडिया यांनी ‘अमृतकाल’वरील कविता सादर करीत पुढील चार वर्षात भारताची अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये राहील, अशी आशा व्यक्त केली. श्रीराम कृष्णन यांनी येत्या दहा वर्षात देशाचा जीडीपी दहा ट्रिलियमवर जाणार असून कॅपिटल मार्केट वाढणार आहे. त्यामुळे दोन ते तीन हजार कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये येणार असून गुंतवणूक व उद्योजकांना मोठ्या संधी निर्माण होतील, अे सांगितले. मनी बी इन्स्टिट्यूटच्या आर्थिक प्रशिक्षण व जनजागृती कार्याची प्रशंसा करताना त्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेज मनी बी सोबत काम करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले.
शिवानी दाणी वखरे यांनी प्रास्ताविकातून मनी बीच्या कार्याचा आढावा घेतला व मागील तेरा वर्षांपासून मनी बी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अश्विनी अमृततुल्यचे संस्थापक अतुल खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच, मनीष बन्सल लिखित ‘फायनान्शियल फ्रिडम – अ वे टू रिच लाईफ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आलोक मोहन शेरी, पूनम आलोक शेरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पेटींग भेट दिले. सायंटिफीक सोसायटीतर्फे श्री. गडीकर व त्यांच्या चमूने देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. याज्ञवल्क वखरे यांनी सरस्वती स्तवन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी गलांडे-देशपांडे यांनी केले.
…….
अर्थसंकल्प चार घटकांना समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात अर्थमंत्री सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प गरीब, युवा, शेतकरी आणि महिला याचार घटकांना समर्पित आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर विस्तृत विवेचन केले. त्यांनी यात शेती विकास उत्पादकता, एमएसएमई, गुंतवणूक, मेक इन इंडिया, रोजगार, ऊर्जा, स्टार्टअप, एमएसएमई अशा अनेक क्षेत्रांचा विचार करण्यात आल्याचे सांगितले.
रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, भारत सरकार पियुष गोयल, मॉर्गन स्टॅनली इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रिधम देसाई व व्हेंचर कॅटॅलिस्ट ग्रुपचे सह-संस्थापक अपूर्व शर्मा यांचे भारतीय अर्थशास्त्र, गुंतवणूक, शेअर बाजार आणि संपत्ती निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन.