
काटोल(Katol) २७ जून :- काटोल विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी राज्याचे भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी व या क्षेत्राचे माजी आमदार डॉ आशिषराव र देशमुख(Dr Ashishrao Deshmukh) यांना 3 जून 2024 ला एक निवेदन दिले. त्यात सोयाबीन व कापसाला अनुदान, 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे न मिळालेल्या पिकांची नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीक विमा, अतिवृष्टी व गारपिटीमुळे पिकांची नुकसान भरपाई, विद्युत पंपाचे बिल, संत्र्याचा विमा हप्ता, संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान अशा प्रश्नांवर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.
याबाबतीत तोडगा काढण्यासाठी डॉ आशिषराव र देशमुख यांनी पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना एक निवेदन लिहिले आहे. या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तसेच विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने एक विशेष बैठक बोलावून यावर तोडगा काढावा, अशी विनंती डॉ. देशमुख यांनी आपल्या मुद्देसूद पत्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे. डॉ आशिषराव र देशमुख शेतकरी हितार्थ सदैव तत्पर असतात, याची प्रचिती यातून येते.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनाची प्रत त्यांनी 27 जूनला नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना दिली आणि या विषयावर जातीने लक्ष घालून पाठपुरावा करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा डॉ. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या मागण्या यावेळी व्यक्त केल्या. डॉ. देशमुख यांनी यासंबंधी घेतलेल्या पुढाकाराबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना यावेळी डॉ. आशिषराव र देशमुख म्हणाले, “कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी असण्याआधी मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे. मोठ्या प्रमाणात अडचणीत असलेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान शासनाकडून मिळावे. कमी भाव मिळाल्यामुळे त्यांचा लागवडीचा खर्च देखील निघाला नाही. पिक विमा, कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांच्या समाधानासाठी शेतकऱ्यांनी आपली मागणी केल्यास त्यात गैर काहीच नाही. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निवेदन त्यानिमित्याने दिले आहे.
धानाच्या धर्तीवर सोयाबीन व कापसाला अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांचे अनुदान व्यापाऱ्यांना जाऊ नये. कर्जमाफीच्या संदर्भातील अडचणी दूर कराव्यात. पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळत नाही आहे, तो मिळावा. विदर्भातील शेतकरी अडचणीत आहे.
लोकसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात महायुतीला शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी जातीने लक्ष घालून विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण कराव्यात, ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही करीत आहे. मी सदैव शेतकऱ्यांसोबत उभा आहे. विदर्भातील कित्येक जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे दुपार पेरणीची वेळ आली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना कळतील. त्यासाठी एक विशेष बैठक बोलविण्याची गरज आहे.”
सर्वश्री दिनकर राऊत, मनोज जवंजाळ, महादेव नखाते, बबन लोहे, नितीन धोटे, अंगद भैस्वार तसेच शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.














