
नागपूर -नागपुरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत. आतापर्यंत 140 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
उपराजधानीत एसडीआरएफच्या 2 तुकड्या 7 गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.आतापर्यंत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात लागले आहे. इतकेच नव्हे तर अंबाझरी परिसरात लष्कराच्या 2 तुकड्या पोहोचत आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. यासोबतच
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन, पदाधिकारी यांना दिले आहेत.