लोकशाहीला शिवशाहीची किनार आवश्यक – सद्गुरुदास महाराज

0

‘आधुनिक युगात शिवचरित्राचे महत्व’ विषयावर व्याख्यान

नागपूर: आजच्या लोकशाहीत घडणाऱ्या घटना बघता लोकशाहीला शिवशाहीची किनार आवश्यक आहे असे प्रतिपादन सद्गुरुदास महाराज यांनी केले. देशात स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, तरुणांची व्यसनाधीनता, राष्ट्रीयत्वाची भावना लोप पावणे असे मुद्दे भेडसावत असताना, शिवाजींच्या काळातील नीतिमूल्यं आणि व्यवस्था प्रणाली जपली तर लोकशाही व्यवस्था यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अयोध्या नगर येथील प.पू. विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राचा तपपूर्ती सोहळ्यात ‘आधुनिक युगात शिवचरित्राचे महत्व’ विषयावर जाहीर व्याख्यान करताना धर्मभास्कर प.पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांची उपस्थिती होती.
सद्गुरुदास महाराज पुढे म्हणाले की विज्ञानाने फार मोठा पल्ला गाठला आहे, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विकास होताना बघायला मिळतो आहे. परंतु भौतिक विकास होत असताना या मने भकास तर होत नाही ना याची काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला. आधुनिक विज्ञानाचा ‘हनीट्रॅप’ सारखा दुरुपयोग देशविघातक असल्याचे त्यांनी सांगितले. आज तरुणांना शिवाजी व्हावे असे वाटत नसून मोठ्या पगाराची नोकरी धरून परदेशात जायचे आहे. यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना कमी पडते आहे. त्यासाठी काम करणे गरजेचे आहे असे देखील ते म्हणाले. शिवाजीमहाराजांचे स्मरण आवश्यक असून शिवचरित्राचे पठण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशांक सोहनी यांनी केले . कार्यक्रमाची सांगता शिवाजीमहाराजांच्या आरतीने झाली. कार्यक्रमाची सुरवात सद्गुरुदास महाराजांच्या भव्य स्वागताने झाली.