
जिल्हा नाट्यगृह पूर्वनियोजित ठिकाणीच व्हावे
वर्धा :- प्रस्तावित जिल्हा सांस्कृतिक संकुल अर्थात शासकीय नाट्यगृह पूर्वनियोजित ठिकाणीच निर्माण करण्यात यावे, अशी जाहीर मागणी करणारे निवेदन साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी व वर्धेकर कलावंतांनी जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे.
मागील २५ वर्षांपासून वर्धेकर सातत्याने शासकीय नाट्यगृहाची मागणी करीत आहेत. जिल्ह्यात तालुकास्तरावर सुसज्ज नाट्यगृह निर्माण झाले आहे. मात्र, विदर्भातील सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या वर्धानगरीत अद्यापही नाट्यगृह उभे झाले नाही. २०१८मध्ये या मागणीला मंजुरी प्राप्त होऊन जिल्हा नाट्यगृहासाठी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची जागा निश्चित करण्यात आली होती. मध्यंतरी काही कारणाने नाट्यगृहाच्या कार्यास सुरुवात होऊ शकली नाही. आता नव्याने वर्धेकरांची ही मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारात सांस्कृतिक मंत्रालयाने नुकतीच मान्य केली असून त्यासाठी निधीही जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या होऊ घातलेल्या नाट्यगृहासाठी सेवाग्राम रोडवरील एमआयडीसी परिसरातील जागेची निवड करण्यात आली आहे. ही प्रस्तावित जागा शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि स्थानीय व अतिथी कलावंतांपासून रसिकांपर्यंत सर्वांसाठीच गैरसोयीची आहे. नाट्यगृहासाठी निवडण्यात आलेल्या या प्रस्तावित स्थळापासून जवळच प्रशस्त चरखागृह, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे नाट्यगृह तसेच बापूकुटी परिसरात यात्री निवास, एम्फी थिएटर व अन्य सभागृहे असल्याने त्याच भागात पुन्हा नवे शासकीय सभागृह उभे करणे अव्यवहार्य आहे.
यापूर्वी प्रशासनाद्वारे नाट्यगृहासाठी निश्चित करण्यात आलेली महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची जागा सर्वच दृष्टीने सोयीस्कर असून हे स्थळ बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून अगदी जवळ असल्याने येथे नाट्यगृह निर्माण झाल्यास बाहेरगावच्या लोकांनाही कार्यक्रमास येणे सोयीस्कर होईल. या परिसरात रात्री उशिरापर्यंत लोकांची सतत वर्दळ राहत असल्याने ही जागा सुरक्षितही आहे. तसेच शहरातील सर्व रस्ते बजाज चौकाला जोडलेले असल्याने येथे ऑटो रिक्षा व अन्य वाहने येण्याजाण्यासाठी सहज उपलब्ध असतात. या सर्व व्यवहार्य बाबींचा विचार करता प्रस्तावित शासकीय नाट्यगृह या पूर्वनियोजित जागेवरच बांधण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सांस्कृतिक संकुल निर्माण समन्वय समितीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सहसंयोजक प्रा. पद्माकर बाविस्कर, सिनेनाट्य दिग्दर्शक हरीश इथापे, विदर्भ साहित्य संघ शाखेचे कार्याध्यक्ष डाॅ. राजेंद्र मुंढे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डाॅ. सचिन पावडे, बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. बाबाजी घेवडे, आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवाराचे अध्यक्ष डाॅ. शेख हाशम, भारतीय लोकशाही अभियानचे अतुल शर्मा, डाॅ. चेतना सवाई, नयी तालीम समितीचे मंत्री डाॅ. प्रभाकर पुसदकर, साहित्य कला शोधक मंचाचे अध्यक्ष सुनील बुरांडे, दिलीप मेने, संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डाॅ. सतीश पावडे, सत्यशोधक समाजचे डाॅ. अशोक चोपडे, युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगूळ, प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष प्रा. मोहन गुजरकर, महिला किसान अधिकार मंचच्या प्रा. नूतन माळवी, परिवर्तनधारा साहित्य कला मंचाचे अध्यक्ष प्रा. राजेश डंभारे, अध्ययन भारतीचे अविनाश हलुले, आनंदी कट्टा कला मंचच्या संयोजक प्रा. संध्या देशमुख, संस्कार भारतीचे कार्याध्यक्ष शाम सरोदे, वर्धा कलोपासक संघाचे सचिव किरण पट्टेवार, कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष पोहाणे, स्वरताल संगत परिवाराचे अनिल दाऊतखानी, बिरादरी कलावृंदाचे मनीष खडतकर, युवक बिरादरीचे शिवम घाटे, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत डकरे, सरचिटणीस ॲड. नंदकुमार वानखेडे, ओबीसी जनजागृती संघटनेचे अध्यक्ष अजय भेंडे, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाचे शाखा सचिव बी.एस. मिरगे, ज्येष्ठ संगीतज्ञ प्रा. विकास काळे, सूरमणी वसंत जळीत, अजय हेडाऊ, शशिकांत बागडदे, नितीन वाघ, खुशबू कठाणे, सृजन साहित्य संघाच्या शाखाध्यक्ष प्रीती तडस वाडीभस्मे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य मीनल रोहणकर, प्राचार्य जयश्री कोटगीरवार, प्राचार्य डाॅ. राजेश देशपांडे, डाॅ. धनंजय सोनटक्के, डाॅ. प्रमोद नारायणे, प्रा. एकनाथ मुरकुटे, डाॅ. सिद्धार्थ बुटले, डाॅ. अन्वर सिद्दीकी, सुषमा पाखरे, ज्योती भगत, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुनील तितरे, विकास फटिंगे, डाॅ. सुनीता कुर्वे, श्याम भेंडे, तेजस भातकुलकर, सीमा मुळे, डाॅ. सुरभी बिप्लव, लोककलावंत जीवन चोरे, धनंजय नाखले, नृत्य दिग्दर्शक किरण खडसे, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा शाखेचे राज्य संघटक पंकज वंजारे, जिल्हा महिला शाखेच्या संघटक डाॅ. सुचिता ठाकरे, सुरेश राहाटे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाखाध्यक्ष नरेंद्र कांबळे, डॉ. माधुरी झाडे, प्राचार्य डाॅ. चंदू पोपटकर, सचिन घोडे, जगदीश भगत, सुमीत उगेमुगे, रोटरी क्लबचे राजकुमार जाजू, संगीता इंगळे, लाॅयन्स क्लबच्या योगिता मानकर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, योग प्रशिक्षक दामोदर राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील कलावंत व कार्यकर्त्यांनी केली आहे.
जागेची अदलाबदल करण्यात यावी
शासनाच्या प्रस्तावित आनंद गुरुकुल निवासी शाळेकरिता महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची जागा राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आजघडीला नाट्यगृहासाठी सर्वात विस्तीर्ण व मध्यवर्ती जागा म्हणजे महात्मा गांधी विद्यालयाचे मैदान असून ही जागा भव्य नाट्यगृह, अतिथीगृह, अन्य पूरक इमारती आणि मोठे वाहनतळ सहज सामावून घेणारी आहे. तर, सेवाग्राम रोडवरील परिसरात नाट्यगृहासाठी निवडण्यात आलेली जागा ही शासकीय निवासी शाळेकरिता अधिक योग्य ठरेल. ही जागा वर्दळीपासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अधिक सोयीची आहे. शहराबाहेर नाट्यगृह झाल्यास त्याला नागरिकांचा फारसा प्रतिसाद राहणार नाही. त्यामुळे दोन्ही जागांची अदलाबदल करण्यात यावी, अशी व्यवहार्य मागणी वर्धेकरांनी केली आहे.